वारे गुरूजी यांची निर्दोष मुक्तता ; अखेर सत्याचा विजय
वाबळेवाडी सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी करणाऱ्या दत्तात्रय वारे यांना सर्व आरोपांमधून दोष मुक्त करण्यात आले आहे. वाबळेवाडीच्या शाळेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही 'वारे गुरुजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वाबळेवाडी सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी करणाऱ्या दत्तात्रय वारे यांना सर्व आरोपांमधून दोष मुक्त करण्यात आले आहे. वाबळेवाडीच्या शाळेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
वाबळेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी डोनेशन घेतला जात असल्याचा आरोप वारे गुरुजींवर ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेमार्फत त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून त्यांची चौकशी सुरू होती. शालेय कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणे व कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग करणे, शालेय प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता व निष्काळजीपणा करणे, महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा वर्तवणूक नियम 1967 मधील नियम ३ चा भंग करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. हे तीनही आरोप सिद्ध झाले नाहीत.
विधानसभेत व गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडीच्या शाळेतील अनियमिततेबाबत पुन्हा एकदा भाष्य केले होते. त्यावर स्थानिक नागरिकांनी आमदार पवार यांच्या गाव बंदीचा ठराव केला होता. त्यानंतर आता वारे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वारे गुरूजी हे राजकारणाचा बळी ठरले,अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात होती.तसेच चांगले काम कराल तर तुमचा वारे गुरूजी होईल,अशी म्हण शिक्षण क्षेत्रात नव्याने समोर आली होती.मात्र, या सर्वांना वारे गुरूजी यांच्या निर्दोष मुकत्तेमुळे उत्तर मिळाले आहे.
दत्तात्रय वारे गुरुजी यांची विभागीय चौकशी झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सुद्धा विभागीय चौकशी अहवालाशी सहमती दाखवून दत्तात्रय वारे यांना दोष मुक्त केले आहे.
eduvarta@gmail.com