Teachers Recruitment : निवृत्त शिक्षकांना अच्छे दिन; पंधरा दिवसांत भरती करण्याचे शासनाचे आदेश

शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी तीन दिवसांपूर्वी हे आदेश काढले आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे हे आदेश आहेत.

Teachers Recruitment : निवृत्त शिक्षकांना अच्छे दिन; पंधरा दिवसांत भरती करण्याचे शासनाचे आदेश
Teachers Recruitment in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उच्च न्यायालयात (High Court) दाखल रिट याचिकांमुळे शिक्षक भरती प्रक्रियेमुळे (Teachers Recruitment) विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून (Maharashtra Government) जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (ZP Schools) निवृत्त शिक्षकांची (Retired Teachers) तातडीने भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या सुचना शिक्षण आयुक्तांसह सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी तीन दिवसांपूर्वी हे आदेश काढले आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे हे आदेश आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

शालेय शिक्षणात महाराष्ट्राची घसरण का? शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंनी सांगितले कारण...

या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात यावीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पूर्ण केली जाणार आहे.

निवृत्त शिक्षकांच्या भरतासाठी शासनाने दिलेल्या सुचना

१. नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील.

२. मानधन प्रति महिना २० हजार रुपये (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त)

३. जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.

सेतू अभ्यासाने वाढतेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता; सर्वेक्षणातून महत्वाचे निष्कर्ष समोर

४. बंधपत्र / हमीपत्र: नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र / हमीपत्र घेण्यात यावे. या बंधपत्र / हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, याचा उल्लेख करण्यात यावा.

५. प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत.

६. संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी.

७. वरीलप्रमाणे करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.

८. वरीलप्रमाणे नियुक्त्या १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD