MPSC कडून परीक्षेच्या तारखांचा घोळ; ' यथावकाश' शब्दाने उमेदवारांमध्ये नैराश्य, तारखा जाहीर करण्याची मागणी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवीन तारखा देण्यास अडचण काय? नवीन तारखा दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन त्यांचे नैराश्य जाईल.

MPSC कडून परीक्षेच्या तारखांचा घोळ; ' यथावकाश' शब्दाने उमेदवारांमध्ये नैराश्य, तारखा जाहीर करण्याची मागणी 

एज्युवार्ता न्यूज न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अनुकरण केले जाते.मात्र,परीक्षेच्या तारखा (Examination dates)जाहीर करताना 'यथावकाश' शब्दाचा वापर केला जातो. नुकतेच राज्य लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक जाहीर करून, समाज कल्याण विभाग परीक्षा 2023 व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 (Social Welfare Department Exam 2023 and State Services Pre Exam 2024)या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.तसेच परीक्षा पुढे ढकलताना परीपत्रकात 'यथावकाश' हा शब्द वापरलेला आहे.मात्र, यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नैराश्य (Depression among candidates)आले असून त्यांच्यासमोर आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत.त्यामुळेच आयोग परीक्षांच्या तारखा का जाहीर करत नाही ? आयोगाला आपल्या उमेदवारांची चिंता नाही का? असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोग आपली परीक्षा पुढे ढकलताना नवीन तारीख देत असेल; तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवीन तारखा देण्यास अडचण काय? नवीन तारखा दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर होऊन त्यांचे नैराश्य जाईल.तसेच त्यांना तयारी करण्यासाठीचे  नियोजन आखता येईल, याचा देखील एमपीएससीने गांभीर्याने विचार करावा,अशा उमेदवारांच्या भावना आहेत.

 कोरोना काळामध्ये देखील परीक्षा वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या होत्या.तेव्हा देखील आयोगाने यथावकाश हा शब्द वापरलेला होता.मुळातच कोणत्याही पुढील तारखा न देता फक्त पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतला जातो.हे समजण्यापलीकडचे आहे. या निर्णयामुळे सबंध राज्य भरातील उमेदवार प्रचंड नैराश्यात गेले आहेत. कारण, विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करण्यासाठी दरमहा आठ ते दहा हजार रुपये खर्च येत आहे. पुण्यासारख्या शहरात राहून लाखो उमेदवार परीक्षांची तयारी करतात. कोरोना काळात  देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, हे आयोगाने समजून घ्यायला हवे.

कोणत्याही तारीखा जाहीर न करता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. लग्नासाठीच वाढतं वय, मुलींना घरून शिक्षणासाठी मिळणारा अपुरा कालावधी, खर्चाचा प्रश्न अशा अनेक बाबी उमेदवारांच्या जीवनाशी निगडित असताना आयोग याचा कोणताही सारासार विचार करताना दिसत नाही.त्यामुळे आयोगाने आपले उमेदवार वार्‍यावर सोडलेले आहेत का? , आयोगाला आपल्या उमेदवारांची कोणतीही चिंता नाही का? असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत. आपल्या उमेदवारांचा सांगोपांग विचार करून आयोगाने तात्काळ नवीन तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.तसेच पुरोगामी महाराष्ट्रात उमेदवारांनी आपल्या न्याय हक्कासाठी नेहमी आंदोलनेच करावीत का? हाही प्रश्न या निमित्ताने उमेदवार उपस्थित करत आहेत. 

---------------------------------
उमेदवारांना आलेले नैराश्य व त्यातून व्यक्त होणाऱ्या तीव्र भावना यांचा विचार राज्य लोकसेवा आयोगाने नक्कीच केला पाहिजे, असे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. उमेदवारांचे आयुष्य, वाढते वय, आर्थिक नियोजन, मुलींना शिक्षणासाठी मिळणाऱ्या अपुऱ्या संधी याबाबी आयोगाने विचारात घेऊन पुढे ढकळलेल्या परीक्षांच्या तारखा तात्काळ जाहीर कराव्यात. केंद्रीय लोकसेवा आयोग नवीन तारखा  देऊ शकतो, तर राज्य लोकसेवा आयोग का नाही. 
- महेश बडे, एमपीएससी स्टूडेंट राईट्स 
----------------------
आयोगाच्या परीक्षा वारंवार पुढे गेल्याने अनेक उमेदवार नैराश्यात आहेत.राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे.शहरात राहण्यासाठी होणारा खर्च गरीब कुटुंबातील उमेदवारांना परवडणारा नाही.आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली नाही तरच उमेदवारांना पुढील निर्णय घेता येईल.उमेदवारांचे वाढणारे वय , न परवाडणारा खर्च याचा विचार करून आयोगाने परीक्षांबाबत स्पष्टता द्यायला हवी,अशी अनेक उमेदवारांची भावना आहे. 
- रुपाली यादव, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी (नाव बदलले आहे )