बीए. बीकॉम. मध्ये प्रवेशाची संधी; विद्यापीठाने वाढविली अर्ज करण्याची मुदत

दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी यंदा पाठ फिरविल्याचे चित्र आहे. प्रवेशासाठी दोन महिन्यांची मुदत देऊनही मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजारांनी प्रवेश घटले आहेत.

बीए. बीकॉम. मध्ये प्रवेशाची संधी; विद्यापीठाने वाढविली अर्ज करण्याची मुदत
SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेअंतर्गत (Distance Education Admission) कला व वाणिज्य विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर पदवी या दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत विद्यापीठ प्रशासनाने वाढविली आहे. त्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. (Savitribai Phule Pune University News)

 

दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी यंदा पाठ फिरविल्याचे चित्र आहे. प्रवेशासाठी दोन महिन्यांची मुदत देऊनही मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजारांनी प्रवेश घटले आहेत. यंदा केवळ ३ हजार २८४ एवढेच प्रवेश झाले आहेत. यापार्श्वभूमीवर विद्यापीठाने प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ दिल्याचे समजते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यावा, या हेतूने ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी दि. १९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्रमदानातून स्वच्छता

 

इच्छूक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज व प्रवेश शुल्क भरण्याची मुदत दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. २५ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रेंद्रावर जमा करणे आवश्यक आहे.

 

दरम्यान, विद्यापीठाने दि. १ ऑगस्टपासून दूरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. सुरूवातीला इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत महिनाभरासाठी वाढविण्यात आली. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अखेरची मुदत शनिवारी (दि. ३०) सायंकाळी पाच वाजता संपली होती

 

दोन महिन्यांच्या कालावधीत बीएसाठी ५३२, बीकॉमसाठी ७५६, एमएसाठी १ हजार ६२ तर एमकॉमसाठी ९३४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे. एकूण ३ हजार ९२८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. पण प्रत्यक्षात ३ हजार २८४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. मागील वर्षी या अभ्यासक्रमांमध्ये एकूण ५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

 

मागील वर्षी सर्वाधिक २ हजार ८९ प्रवेश एमकॉमला झाले होते. यंदा मात्र एमएला सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. एमकॉमच्या प्रवेशात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्याचप्रमाणए एमएचे प्रवेशही जवळपास ५०० ने कमी झाले आहेत. बीए व बीकॉमच्या प्रवेशातही लक्षणीय घट झाल्याचे दिसते. विद्यापीठाने प्रवेशासाठी दोन महिन्यांची मुदत देऊनही विद्यार्थ्यांना प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे दिसते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j