SPPU News : आदिती भोईटे ठरली यंदाची ‘गोल्ड मेडलिस्ट’; हरहुन्नरी आदितीला व्हायचंय प्राध्यापक

येत्या १ जुलै रोजी विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ असून या कार्यक्रमात आदितीला सुवर्णपदक प्रदान केले जाईल. ती आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

SPPU News : आदिती भोईटे ठरली यंदाची ‘गोल्ड मेडलिस्ट’; हरहुन्नरी आदितीला व्हायचंय प्राध्यापक
SPPU Gold Medalist Aditi Bhiote

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाबाबत (Graduation Ceremony) विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच कुतूहल असते. या समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्याचा आनंद काही निराळाच. त्यातचही सुवर्णपदक मिळविण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आदिती भोईटे (Aditi Bhoite) या विद्यार्थिनीचे हे स्वप्न साकार झाले आहे. तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) सुवर्णपदक जाहीर झाले आहे.

हरहुन्नरी असलेली आदिती आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकाची अदिती मानकरी ठरली आहे. येत्या १ जुलै रोजी विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ असून या कार्यक्रमात आदितीला सुवर्णपदक प्रदान केले जाईल.

QS World Ranking : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घसरण, देशात १६ व्या क्रमांकावर

आदिती ही गणित विषयाची पदवीधर असून याच विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. आदितीचा पदवीचा  क्रेडिट स्कोर १० पैकी  ९.५ इतका आहे. सुवर्णपदाची मानकरी ठरल्यानंतर 'एज्युवार्ता ' शी बोलताना आदिती म्हणाली, मी सध्या गणित विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. सेट-नेट देऊन मला प्राध्यापिका व्हायचे आहे. मी १२ वी पर्यंत अगदी रँक स्टुडन्ट नसले तरी पहिल्या पाच मध्ये नेहमी यायचे. मी कधीच क्लास लावला नाही, नेहमी सेल्फ स्टडीवर भर दिला. कॉलेजमध्ये सुद्धा वर्गात शिक्षकांनी दिलेल्या नोट्सवर अभ्यास करत होते.

मला नेहमीच अध्यापनाकडे विशेष आकर्षण होते. आताही मी ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एका क्लासच्या माध्यमातून  शिकवते, CET च्या मुलांनाही मी मार्गदर्शन केले आहे, असेही आदितीने सांगितले.  आदितीने महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून  सहभाग घेतला होता. महाविद्यालय पातळीवरील विविध स्पर्धा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून भरवण्यात येणाऱ्या मॉडेल मेकिंग, पोस्टर मेकिंग स्पर्धेत आदितीचा सक्रिय सहभाग होता. यांसह विविध उपक्रमांमध्येही तिने प्रतिनिधित्व केले आहे.

'' पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. संस्थेच्या प्राध्यापकांनी मोठे परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने घडवण्याचे काम सुरू ठेवले आहे. गेल्या सात आठ वर्षात संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळालेले हे १७ वे सुवर्ण पदक आहे . आदिती भोईटे हिला मार्गदर्शन करणा-या रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन. "

- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विद्यान व तंत्रज्ञान विद्याशाखा , सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठ, पुणे 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2