एमपीएससीमध्येच होणार कंत्राटी तत्वावर लिपिक -टंकलेखकांची भरती

राज्य शासनाने आयोगाला एकूण 45 लिपिक व टंकलेखकांची कंत्राटी पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

एमपीएससीमध्येच होणार कंत्राटी तत्वावर लिपिक -टंकलेखकांची भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने भरतीचा (Recruitment on contract basis)अध्यादेश रद्द केला असला तरी विविध शासकीय विभागात कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु, शासनाच्या सर्व  विभागांना सारसेवा व सेवांतर्गत परीक्षा घेऊन पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरच (Maharashtra Public Service Commission)आपले कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी स्वतःच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने आयोगाला एकूण 45 लिपिक व टंकलेखकांची कंत्राटी पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे विविध परीक्षांच्या निकालाचे काम वेळेत पूर्ण करताना अडचणी येतात. आयोगाच्या एकूण मंजूर पदांपैकी 45 लिपिक व तंत्र लेखकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याबाबत शासनाकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने ही पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार पदोन्नती, नामनिर्देशन कोट्यातील अहर्ताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत संबंधित पदावरील कर्मचारी यंत्रणेद्वारे घेता येणार आहेत. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने आयोगाने जाहिरात प्रसिद्ध करून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आयोगात प्रतिनियुक्तीबाबत आव्हान केले होते. 20 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार 3  जणांना एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्ती वर घेण्यात आले आहेत. परंतु, आयोगातील रिक्त पदे न भरल्याने व अतिरिक्त पदे मंजूर न केल्यामुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आयोगात मनुष्यबळाची आवश्यकता व सर्वंकष बाबी विचारात घेऊन 45 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.