शाब्बास ! बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरलाही सापडले 42 कॉपी बहाद्दर 

परीक्षेत गैरप्रकार करण्यात छत्रपती संभाजी नगर विभाग आघाडीवर आहे.

शाब्बास ! बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरलाही सापडले 42 कॉपी बहाद्दर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीची परीक्षा (12th Exam)घेतली जात असून शुक्रवारी मराठीसारख्या भाषा विषयाच्या पेपरला तब्बल 42 कॉपी (copy cases)बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली . तर दुपारच्या सत्रातील उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली या भाषा विषयाच्या परीक्षेत दोन विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले.परीक्षेत गैरप्रकार करण्यात छत्रपती संभाजी नगर विभाग आघाडीवर आहे.

राज्य विभागीय मंडळाच्या माध्यमातून 21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली.  इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला 58 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, पंजाबी, बंगाली या भाषा विषयांची परीक्षा होती. सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजी नगर विभागात तब्बल 33 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. तर नागपूर विभागात 4,अमरावती विभागात 3 तर नाशिक विभागात 2 विद्यार्थी गैरप्रकार करताना सापडले. तर दुपारच्या सत्रात नाशिक विभागात 2 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले.

शिक्षण विभागातर्फे गैरमार्गाविरुद्ध लढा, कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. मात्र, इंग्रजी मराठी सारख्या भाषा विषयांना सुद्धा विद्यार्थी कॉपी करताना आढळून येत आहेत.ही चिंतेची बाब आहे.