भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान परंपरा विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.गंटी मूर्ती :  मएसो सीनियर कॉलेजच्या वतीने भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय ज्ञान परंपरा ही कला, संस्कृती आणि विद्येचा महासागर आहे. परंतु, शेकडो वर्षांच्या पाश्चात्य आक्रमणामुळे पाश्चात्य शिक्षणाचा आणि परंपरेचा प्रभाव आपल्या मनावर राहिला आहे, त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेपासून आपण दूर गेलो होतो. आजच्या तरुणांना भारतीय संस्कृतीचे वैभव खऱ्या अर्थाने कळण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान परंपरा विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. गंटी मूर्ती यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वरिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भांडारकर विद्या संशोधन मंदिर यांच्यातर्फे "भारतीय ज्ञान परंपरा" या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गंटी मूर्ती बोलत होते. यांप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, माजी खासदार प्रदीप रावत, भांडारकर संस्थेचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, भारतीय शिक्षण मंडळाचे सहसचिव महेश दाबक, विजय भालेराव, वरिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य रवींद्र वैद्य, उपप्राचार्य डॉ. पुनम रावत उपस्थित होते. 

डॉ. गंटी मूर्ती म्हणाले, भारतीय संस्कृती जगातील एकमेव अशी संस्कृती आहे जी हजारो वर्षानंतरही अस्तित्वात आहे, परंतु, ही परंपरा मोठ्या प्रमाणावर आज मंदिरे आणि केवळ ग्रंथालयांमध्येच अस्तित्वात आहे, ही परंपरा तेथून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या आयुष्याचा एक भाग बनली पाहिजे. जर भारतीय ज्ञान परंपरा सर्वसामान्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली, तरच ही वैभवशाली परंपरा आपण पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. 

डॉ.पराग काळकर म्हणाले, आपल्या संस्कृतीवरील विश्वास कमी करण्याचे महत्त्वाचे काम आक्रमकानी  केले. त्यामुळेच नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे उध्वस्त करण्यात आली. आज गावातील शिक्षण हे शहरांमध्ये आणून ते सर्वसामान्यांना परवडण्याच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळेच आज भारतीय ज्ञान परंपरा गरजेची आहे.   केवळ पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहण्याची स्वतःला सवय लावल्यामुळे आपण आपल्याच भारतीय ज्ञान परंपरेला विसरलो आहोत. 

महेश दाबक म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये भारतीय ज्ञान परंपरा कशाप्रकारे उपयोगात आणता येऊ शकते, हे जर आपण त्यांना लक्षात आणून दिले, तर तेच तरुण ही परंपरा पुढे नेऊ शकतात.

भूपाल पटवर्धन म्हणाले, आजपर्यंत संशोधन क्षेत्रांमध्ये भारतीय कमी पडत होते. परंतु, भारतीय ज्ञान परंपरा जर समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली तर निश्चितच विद्यार्थी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करतील. भारताच्या वैभवशाली परंपरेच्या इतिहासाला आजच्या वर्तमानाशी जोडून उद्याचे भविष्य उज्वल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय ज्ञान परंपरा करू शकेल. 

प्रदीप रावत म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये आणि विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये भारतीयांनी मोठे योगदान दिले आहे. परंतु पाश्चात्यांच्या पगड्यामुळे आपण त्यांचे योगदान विसरत चाललो आहोत. भारतीयांनी केवळ भारताच्याच विकासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये कशाप्रकारे योगदान दिले आहे हे आजच्या तरुणांना कळणे गरजेचे आहे, त्यासाठीच भारतीय ज्ञान परंपरा ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे. 

यावेळी रवींद्र वैद्य ,प्रदीप नाईक, डॉ. मंदार भानुशे, डॉ. प्रदीप आपटे, डॉ. शशिकांत काटरे,डॉ. प्रसाद भिडे ,डॉ. स्मिता लेले यांनी मनोगत व्यक्त केले.गौरी मोघे 
डॉ सुरेखा वैद्य यांनी सूत्रसंचालन , प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य यांनी प्रास्ताविक तर डॉ. पुनम रावत यांनी आभार मानले.