शिक्षिकेने 100 उठाबशा काढायची शिक्षा दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेणाऱ्या काजल गौड या विद्यार्थिनीला शाळेच्या शिक्षिकेने उशिरा आल्यामुळे शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. उशिरा आलेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबर काजलने सुद्धा दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या. परंतु, शाळेतून घरी परतल्यानंतर काजलची तब्येत बिघडली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वसई येथील एका शाळेत विद्यार्थिनी उशिरा आल्यामुळे (student came to school late) तिला शिक्षिकेने 100 उठाबशा (100 sit-ups)काढण्याची शिक्षा दिली. मात्र, या उठावाच्या काढण्याच्या शिक्षेमुळे तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीची तब्येत बिघडली. या विद्यार्थिनीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान बाल दिनाच्या दिवशीच तिचा मृत्यू (Death on Childrens Day)झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
वसई पूर्व भागातील सातिवली येथील हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेणाऱ्या काजल गौड या विद्यार्थिनीला शाळेच्या शिक्षिकेने उशिरा आल्यामुळे शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. उशिरा आलेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबर काजलने सुद्धा दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या. परंतु, शाळेतून घरी परतल्यानंतर काजलची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला तात्काळ वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर इतर रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्यामुळे तिला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा काजलचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन व शिक्षिका यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकरणाची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घेतली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा करणे हा गुन्हा आहे, असे असताना संबंधित शिक्षकेने या पद्धतीची शिक्षा कशी दिली? याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे वसईचे गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांडे यांनी सांगितले.
eduvarta@gmail.com