जपानी शास्त्रज्ञ जेव्हा पुण्यातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्षात संवाद साधतो
सुंदरबाई मराठे विद्यालयात दिनांक १२ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसीय कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत डॉ. मायमा यांनी नद्यांचे प्रदूषण शोधण्यासाठी तयार केलेले सिमरिव्हर हे शैक्षणिक सॉफ्टवेअर दाखविले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील खराडी येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या सुंदरबाई मराठे विद्यालयातील विद्यार्थी (Student at Sundarbai Marathe School)मागील तीन वर्षापासून जपान मधील शाळांतील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नदी स्वच्छतेबाबत संवाद साधत आहेत. त्यानंतर आता थेट जपानच्या शास्त्रज्ञाशी संवाद (Conversation with a Japanese scientist)साधण्याची संधी प्राप्त झाली.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांना थेट जपान येथे सहलीसाठी जाण्याची निमंत्रण मिळाले.त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
टोकियो गाकुएई विद्यापीठ जपानचे शास्त्रज्ञ डॉ. शेकेगी मायमा ,डॉक्टर कार्तिक बाल सुब्रमण्यम प्रयोगशाळेचे संशोधक मथम पी, विघ्नेश्वरम ए ,विद्यालयाची माजी विद्यार्थिनी उत्कर्षा तिखोले यांनी सुंदरबाई मराठे विद्यालयात दिनांक १२ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसीय कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत डॉ. मायमा यांनी नद्यांचे प्रदूषण शोधण्यासाठी तयार केलेले सिमरिव्हर हे शैक्षणिक सॉफ्टवेअर दाखविले. या सिम रिव्हरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी नदीच्या पाण्यातील डायटॉम्स या सूक्ष्म शैवालाच्या सहाय्याने नदीचा साप्रोबिक निर्देशांक कसा मोजायचा याचे प्रात्यक्षिक दाखविले.
डायटॉम्स हे पाण्यातील सूक्ष्म जीव असून पाण्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम कसा होतो. तसेच जपान आणि अमेरिका मधील शाळांनी यावर केलेला अभ्यास व्हिडिओद्वारे दाखवून अशा प्रकारचे लहान लहान प्रयोग मुलांकडून करून घेतले.डॉ. मायमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांची बुद्धिमत्ता आणि संशोधनवृत्ती पाहून सुंदरबाई मराठे विद्यालयातील दहा मुलांना व एक शिक्षकांना टोकियो विद्यापीठ जपान यांचे मार्फत अभ्यास सहलीसाठी निमंत्रण दिले.सहलीचा जाण्या-येण्याचा खर्च विद्यार्थ्यांना करावयाचा असून त्यासाठी पालकांनी आर्थिक मदतीची अपेक्षा केली आहे.
डॉ. मायमा हे मागील तीन वर्षापासून भारतात आल्यानंतर सुंदरबाई मराठे विद्यालयात येतात व मुलांशी भारतातील नद्यांच्या प्रदूषणावर संशोधन करीत आहेत.जपान मधील नद्या स्वच्छ आणि प्रदूषणविरहित कश्यामुळे झाल्या आहेत. या बाबत मुलांना माहिती देऊन मुलांनी भारतातील नद्या दूषित होऊ नये, यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करीत आहे .
मागील वर्षी या शाळेतील मुलांनी जपान मधील शाळेतील मुलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इंग्रजी मधून संवाद साधला होता. तेथील अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आता या मुलांना प्रत्यक्ष भेटीचे निमंत्रण डॉ. मायमा यांनी पत्राद्वारे दिले. ही संधी मिळाल्याने विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना खुप आनंद झाला. संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे,उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मोझे ,संस्था सदस्य संजय मोझे सदस्या अलका पाटील, मुख्याध्यापक संजय सोमवंशी,पर्यवेक्षक श्री सुनील वळसे यांनी या मुलांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. या कार्यशाळेसाठीचे आयोजन विद्यालयातील शिक्षक रोहित डामरे,श्री आशुतोष पवार यांनी केले.
eduvarta@gmail.com