नव्या युगातील कौशल्यांचे ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण : मंत्री मंगलप्रभात लोढा

या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत.

नव्या युगातील कौशल्यांचे ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण : मंत्री मंगलप्रभात लोढा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ८ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी मंत्रालय  आयोजित पत्रकार परिषदेत सांगितली.
 राज्यभरात ६०० ठिकाणी  या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमांना विश्‍वकर्मा समाजातील कारागीर, स्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल. या माध्यमातून त्यांच्या योगदानाला सन्मान मिळेल आणि समाजातील पारंपरिक कौशल्यांविषयी आदरभाव वाढेल. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण २,५०६ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प विभागाने केला आहे.

लोढा म्हणाले , “उद्योगांच्या बदलत्या मागणीनुसार राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. ग्रामीण भागातील युवक तसेच महिला उमेदवारांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाची वैशिष्ट्य आहे.”

प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता
या कार्यक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. प्रशिक्षण शुल्क प्रति महिना रुपये १,००० ते ५,००० इतके निश्चित करण्यात आले आहे. २५ टक्के जागा संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, उर्वरित जागा बाह्य उमेदवारांसाठी खुल्या असतील. या अभ्यासक्रमांसाठी आयटीआयमधील विद्यमान व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच दहावी, बारावी, पदविका किंवा पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पात्र असतील.

उदयोन्मुख क्षेत्रांतील प्रशिक्षण
या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून, त्यात अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी विषयांचा समावेश आहे.

महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, लातूर, नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून, नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल.