बिबट्याच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी १ किमी व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा ३ किमी अंतराच्या आत उपलब्ध असली तरी बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत येतात. तसेच शाळा सुटल्यावर पायी घरी जातात. रस्त्याच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी बिबटे आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बिबट्याच्या हल्यामुळे केवळ ग्रामीणच नाही तर शहरी भागातील काही नागरिकही भयभीत झाले आहेत.त्यातच गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांकडून लहान मुलांवर हल्ले (Leopards attack children)केले जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे.त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील (Leopard prone disaster area) शाळांच्या वेळांमध्ये बदल (Changes in school timings)करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.त्यामुळे सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत भरवाव्यात,असे आदेश देण्यात आले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांवरील बिबटयांच्या हल्ल्यांच्या घटना पारनेर, अहिल्यानगर इ. तालुक्यांमध्ये घडल्या आहेत. त्यात शालेय विद्यार्थी यामध्ये क्षतीग्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस बिबटयांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी १ किमी व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा ३ किमी अंतराच्या आत उपलब्ध असली तरी बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत येतात. तसेच शाळा सुटल्यावर पायी घरी जातात. रस्त्याच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी आहेत.
सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच सद्यस्थितीत हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बिबटयांच्या हल्ल्यामुळे एकही विद्यार्थी क्षतीग्रस्त होऊ नये, विद्यार्थी संध्याकाळी अंधारापूर्वी घरी पोहचू शकतील यासाठी बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० असा बदल शाळा व्यवस्थापन समिती/शाळा समितीची मंजूरी घेवून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही बाब सर्व मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दयावी,अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी गटशिक्षण अधिकारी यांना दिल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच शाळास्तरावर सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत सर्व विद्यार्थ्यांचे तात्काळ उद्बोधन करण्यात यावे. शाळास्तरावर पालक मेळावे घेऊन शाळेत येताना व शाळा सुटताना पाल्यांना स्वतः घेऊन जाणेबाबत पालकांना अवगत करावे. प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची वर्गशिक्षकांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभा दरमहा घेवून विदयार्थी सुरक्षेच्या अधिकच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गट शिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील किती शाळांच्या वेळेत बदल झाला याचा अहवाल तात्काळ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना सादर करावा,असेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
eduvarta@gmail.com