पुणेकर रसिकांसाठी 'बनारस लिट फेस्टिव्हल' ची पर्वणी

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हिंदी मराठी दिग्गज कवींचे काव्य संमेलन हे आहे. या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, विडंबन कवी बंडा जोशी, स्त्रीवादी कवयित्री अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण, आदिवासी कवी तुकाराम धांडे, प्रसिद्ध हिंदी शायरी व कवी मदन मोहन दानिश आदी कवी सहभागी होणार आहेत.

पुणेकर रसिकांसाठी 'बनारस लिट फेस्टिव्हल' ची पर्वणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 भारताची,सांस्कृतिक आणि साहित्यिक राजधानी अशी ओळख असलेल्या बनारस अर्थात वाराणसी - काशी येथील दिग्गज साहित्यिकांचा आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नामांकित साहित्यिक व विचारवंतांचा अनोखा मिलाफ 'बनारस लिट फेस्टिव्हल' च्या(Banaras Lit Festival) निमित्ताने पुणेकर रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. येत्या सोमवारी 15 सप्टेंबर रोजी मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर येथील लता मंगेशकर सभागृहात दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 'बनारस लिट फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलन आणि साहित्यिक चर्चा अशा मराठी - हिंदी या दोन्ही भाषेतील साहित्यिकांच्या विचार व कवितांचा संगम असलेला हा कार्यक्रम आहे. हा अनोखा फेस्टिव्हल सर्वांसाठी मोफत असून पुण्यातील रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सचे विश्वस्त डॉ राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh, Trustee of Priyadarshini Group of Schools)यांनी केले.

 सिंह म्हणाले, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी व हिंदी विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि वाराणसी येथील कशी साहित्य कला उत्सव, नवभारत निर्माण समिती यांच्या वतीने पुण्यात दुसऱ्या 'बनारस लिट फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सभागृहात पाहिला फेस्टिव्हल पार पडला होता. यंदा बनारस लिट फेस्टिव्हलचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे लाभले आहेत. 

पुणेकर रसिक प्रेक्षकांसाठी बनारस लिट फेस्टिव्हलच्या निमित्ताने वातायान अर्थात झुळूक हा 'साहित्याचा महाउत्सव' अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ' समाजाच्या जडणघडणीत साहित्याचे योगदान' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध लेखिका डॉ.अश्विनी धोंगडे, विचारवंत संजय सोनवणी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, हिंदी साहित्यिक अभिषेक तिवारी, प्रा. रवींद्र कात्यायन, आसिफ आझमी हे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. चर्चासत्र दुपारी ४ ते ५ या वेळेत होणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हिंदी मराठी दिग्गज कवींचे काव्य संमेलन हे आहे. या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, विडंबन कवी बंडा जोशी, स्त्रीवादी कवयित्री अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण, आदिवासी कवी तुकाराम धांडे, प्रसिद्ध हिंदी शायरी व कवी मदन मोहन दानिश, श्लेष गौतम, आकृती विद्या अर्पण आणि विनीत कुमार हे काव्य संमेलनात सहभागी होणार आहेत. कवी संमेलन सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत होणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंह हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ सदानंद भोसले हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक : 7028900429