विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत एआय कोर्सेस नाकारणे हा गंभीर राष्ट्रद्रोह : प्रा. किरणकुमार जोहरे
वेळेचे भान ठेवून नव्या शिक्षणदृष्टीचा स्वीकार करूनच आपण ५० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करू शकतो
जगभरात २०२५ पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रात सुमारे ९.७० कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार असून (स्रोत: New Horizons), भारतात २०२८ पर्यंत केवळ AI नव्हे तर IoT, क्लाऊड कॉम्प्युटिंगसह इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे सुमारे २.७३ कोटी नवे रोजगार निर्माण होणार आहेत. (स्रोत: ServiceNow & Pearson )
वेळेचे भान ठेवून नव्या शिक्षणदृष्टीचा स्वीकार करूनच आपण ५० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करू शकतो. विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence - AI) आणि मशीन लर्निंग (Machine Learning - ML) यांसारख्या अत्याधुनिक बीएस्सी व एमएस्सी कोर्सेससाठी मागणी करत असताना, अपवाद वगळता बहुतेक शिक्षणसंस्था मात्र विद्यार्थ्यांवर पारंपरिक व अप्रासंगिक कोर्सेस लादून, बुरसटलेल्या जुनाट व अप्रगत विचारसरणीने नवे शैक्षणिक धोरण राबवत आहेत. स्वातंत्र्याच्या शतकोत्सवाकडे (२०४७) वाटचाल करत असताना, भारताने ५० ट्रिलियन डॉलरच्या तंत्रज्ञानाधारित, उद्यमशील आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणारी शिक्षण व्यवस्था तयार करणे अत्यावश्यक व अपरीहार्य गरज आहे.
विद्यार्थ्यांच्या आकांक्षा, उद्योगजगतातील अपेक्षा आणि सध्याच्या अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यासाठी बीएस्सी व एमएस्सी पातळीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence), मशीन लर्निंग (Machine Learning), रोबोटिक्स (Robotics), क्वांटम कॉम्प्युटिंग (Quantum Computing), क्लाऊड कॉम्प्युटिंग (Cloud Computing), फिनटेक (Financial Technology), इंटरनेट ऑफ थिंग्ज (Internet of Things), प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलर (Programmable Logic Controller - पीएलसी), सुपरवायझरी कंट्रोल अॅण्ड डेटा अॅक्विझिशन (Supervisory Control and Data Acquisition - एससीएडीए), ऑगमेंटेड रिअॅलिटी (Augmented Reality - एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (Virtual Reality - व्हीआर), मिक्स्ड रिअॅलिटी (Mixed Reality - एमआर), ग्राफिक्स डिझाइन व संगणक दृक्-चित्र विश्लेषण (Computer Graphics and Vision), आंतरराष्ट्रीय डिजिटल मार्केटिंग (International Digital Marketing), ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञान आदी कालानुरूप व नैतिकतेला अनुसरून उद्योगक्षमतेकडे नेणारे अभ्यासक्रम सुरू करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तंत्रज्ञानाधारित नव्या अभ्यासक्रमांची आखणी करणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर व राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्यापासून वंचित ठेवणे, आणि त्यांच्या भविष्याशी खेळणे ही अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे.
प्रा. किरणकुमार जोहरे (लेखक प्राध्यापक आहेत)
9130751051
eduvarta@gmail.com