बबलू गायकवाड यांना पीएच.डी पदवी जाहीर; आदिवासी विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता
आदिवासी समुदायांच्या विकासासाठी कार्यान्वित असलेल्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांच्या परिणामकारकतेचे सखोल विश्लेषण हा बबलू गायकवाड यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बबलू गायकवाड यांना पीएच. डी. पदवी जाहीर झाली आहे.गायकवाड यांनी वाणिज्य विद्याशाखेतून व्यवसाय प्रशासनात "केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजनेअंतर्गत ( न्युक्लिअस बजेट ) आदिवासी जमातींसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या कार्यात्मक परिणामकारकतेचा अभ्यास" या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
बबलू गायकवाड हे आदिवासी विद्यार्थी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. तसेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, मांजरी स्टड फार्म, पुणे येथील ते माजी विदयार्थी आहेत.त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
आदिवासी समुदायांच्या विकासासाठी कार्यान्वित असलेल्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांच्या परिणामकारकतेचे सखोल विश्लेषण हा बबलू गायकवाड यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. या अभ्यासातून योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि त्या सुधारण्यासाठीच्या उपायांवर त्यांनी प्रकाश टाकला.
बबलू गायकवाड यांनी बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे ( BMCC, Pune ) येथील संशोधन केंद्रात आपले संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी एम. यु. वाणिज्य महाविद्यालय, पिंपरी -चिंचवडच्या माजी प्राचार्य श्रीमती प्रा. डॉ. वर्षा बोरगावकर आणि बी. एम. सी. सी. संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत साठे यांनी मार्गदर्शन केले. या संशोधनासाठी त्यांना संशोधन केंद्रातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय विभाग यांचेही सहकार्य लाभले.