विद्यापीठाच्या प्राध्यापक रजनी पंचांग यांना प्रतिष्ठित फेलोशिप 

डॉ. रजनी पंचांग या वर्षी या श्रेणीत निवड झालेल्या देशातील एकमेव भू-विज्ञानी (Earth Scientist) असून एकूण चार भारतीय संशोधकांना ही फेलोशिप प्राप्त झाली आहे.

विद्यापीठाच्या प्राध्यापक रजनी पंचांग यांना प्रतिष्ठित फेलोशिप 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील यूजीसी सहाय्यक प्राध्यापक डॉ. रजनी पंचांग (Professor Dr. Rajni Panchang)यांना Fulbright-Kalam Climate Fellowship for Academic and Professional Excellence 2025 ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेलोशीप (Prestigious International Fellowship) प्राप्त झाली आहे. या फेलोशिपअंतर्गत डॉ. पंचांग नोव्हेंबर २०२५ पासून अमेरिकेतील Florida A&M University, Tallahassee, Florida येथे नऊ महिन्यांच्या संशोधनासाठी जाणार असून, त्या नामांकित सागरी वैज्ञानिक प्रा.पामेला हॉलॉक आणि डॉ. मायकेल मार्टिनेज-कोलोन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणार आहेत.

Fulbright-Kalam Climate Fellowship ही यूएस-इंडिया एज्युकेशनल फाउंडेशन (USIEF) मार्फत चालवली जाणारी योजना असून, अमेरिकेत ८ ते १२ महिन्यांच्या कालावधीत हवामान बदल विषयक संशोधनासाठी भारतीय संशोधकांना संधी देते. या कार्यक्रमाचा उद्देश भारत आणि अमेरिका यांच्यात हवामान बदलविषयक दीर्घकालीन संशोधन सहकार्य विकसित करणे हा आहे.

डॉ. रजनी पंचांग या वर्षी या श्रेणीत निवड झालेल्या देशातील एकमेव भू-विज्ञानी (Earth Scientist) असून एकूण चार भारतीय संशोधकांना ही फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यांनी आपले पीएच.डी. पदवी शिक्षण सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा (२००८) येथून पूर्ण केले असून त्या आघारकर संशोधन संस्था, पुणे तसेच आयआयएसईआर, पुणे येथे महिला शास्त्रज्ञ आणि एसईआरबी फास्ट-ट्रॅक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या.

या कालावधीत त्या समुद्री जैव-खनीजीकरण करणाऱ्या जीवांवर (marine bio-calcifiers), विशेषतः प्रवाल भित्तीतील फोरॅमिनिफेरा यांवर महासागरातील आम्लिकरणाचा परिणाम कितपत होतो,याचा अभ्यास करतील. फ्लोरिडा रीफ ट्रॅक्टमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासह प्रयोगशाळेतील अभ्यास तसेच १९८० नंतर संकलित वातावरणीय व जैव-नमुन्यांच्या विश्लेषणाचा एकत्रित वापर त्यांच्या संशोधनात केला जाणार आहे.

मानवी उत्पन्न कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे महासागरातील आम्लिकरणाचा समुद्री जीवांवर होणारा परिणाम ओळखून या संशोधनाद्वारे शाश्वत महासागर व्यवस्थापनासाठी धोरणात्मक आणि आर्थिक आराखडे तयार करण्यास मदत होईल, असा डॉ. पंचांग यांचा विश्वास आहे. तसेच महासागरातील बदलांचे जीववैज्ञानिक संकेत ओळखण्याचे कौशल्य स्थानिक युवकांना प्रशिक्षणाद्वारे देण्यावरही त्यांचा भर असेल.