तलाठी भरती : पेपर फोडण्यासाठी खासगी बंगल्यात परीक्षा ; औरंगाबादमधील घटना, पोस्ट व्हायरल

औरंगाबाद जिल्ह्यातील ऍक्टिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एआयआयटी) या परीक्षा केंद्रावर १ सप्टेबर रोजी ८८ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परंतु,संबंधित परीक्षा केंद्र हे एका खासगी बंगल्यात असल्याचे आढळून आले.

तलाठी भरती :  पेपर फोडण्यासाठी खासगी बंगल्यात परीक्षा ; औरंगाबादमधील घटना, पोस्ट व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात आता औरंगाबाद  (Aurangabad) येथील एका खाजगी मालकीच्या बंगल्यातील परीक्षा केंद्रावर ८८ विद्यार्थ्यांची तलाठी भरतीची परीक्षा (Talathi Recruitment Examination in Privately Owned Bungalows) घेण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील एक पोस्ट सध्या व्हायरल (post viral) झाली असून कॉपी करण्यासाठीच अशा परीक्षा केंद्रांची निवड केली जाते का ? असा प्रश्न तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : 'त्या' महाविद्यालयाने पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले

राज्य शासनाकडून 75 हजार पदभरतीची घोषणा करण्यात आली. 'निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान' या ब्रीद वाक्यानुसार कारभार सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षांमध्ये काही ना काही अनुचित प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. मात्र, याबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे केवळ पेपर फोडण्यासाठीच परीक्षा घेतल्या जात आहेत का ? असा प्रश्न आता विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ॲक्टिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एआयआयटी) या परीक्षा केंद्रावर १ सप्टेबर रोजी ८८ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परंतु,संबंधित परीक्षा केंद्र हे एका खासगी बंगल्यात असल्याचे आढळून आले. आशा परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे योग्य आहे का? या ठिकाणी कितीही गैरप्रकार झाले आणि गैरप्रकार करणारे आरोपींना पकडले तरीही शासन यांना क्लीनचीटच देईल,असा आशय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आहे. पेपर फोडून महाराष्ट्र वेगवान किंवा गतिमान होणार नाही. तर प्रत्येक परीक्षा ही पारदर्शकपणे घेतली जात आहे,असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटायला हवा, अशा भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याची जबाबदारी देणे उचित नसल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत लक्ष न घातल्यास स्पर्धा परीक्षा देणारे  विद्यार्थी निश्चितच आक्रमक पवित्रा घेतील याबाबत कोणतीही शंका नाही. राज्यातील विविध संघटनांनी मुख्यमंत्री यांना परीक्षेतील पारदर्शकतेबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनाची दखल घेतली जाणार आहे किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.