टीसीएसच्या कर्मचार्‍याने केले आपल्या नातेवाईकांना तलाठी भरतीत पास; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा दावा

अमोल विधाते हा ऋषिकुमार लोखंडे यांचा मेहुणा असून अमोल विधाते हा टीसीएस कंपनीमध्ये काम करतो. याने त्यांना पास केले, असा दावाही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

टीसीएसच्या कर्मचार्‍याने केले आपल्या नातेवाईकांना तलाठी भरतीत पास; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा दावा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Talathi Bharti:  तलाठी परीक्षेच्या निकालानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. त्यात टीसीएस (TCS) कंपनी मधील एका कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना मदत करून तलाठी परीक्षेत पास केले असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट व्दारे म्हटले आहे. तसेच अमोल विधाते , ऋषिकुमार लोखंडे यांची नावे घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करावी.त्यानंतर सत्य समोर येईल, असा दावाही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. 

राज्य शासनातर्फे टीसीएस कंपनीच्या माध्यमातून तलाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. नुकताच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात अनेक उमेदवारांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. परीक्षा 200 गुणांची आणि उमेदवारांना 200 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. यामुळे तलाठी भरतीसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. नॉर्मलायझेशननंतर ही गुण वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.परंतु तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याचे समोर आले होते. त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेल्या रिक्षाचालक आणि गृहिणी असणाऱ्या उमेदवारांना 208 व 198 गुण मिळाल्याचा आरोप केला आहे. ठाणे जिल्हा तलाठी टॉपर मधील ऋषिकुमार दामोदर लोखंडे आणि तेजश्री शिवाजी नवले यांना हे गुण मिळाले आहेत, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तलाठी परीक्षेत 198 गुण मिळालेल्या तेजश्रीचे माहेरचे नाव तेजश्री शिवाजी नवले तर सासरचे नाव तेजश्री अमोल विधाते आहे. अमोल विधाते हा ऋषिकुमार लोखंडे यांचा मेहुणा असून अमोल विधाते हा टीसीएस कंपनीमध्ये काम करतो. याने त्यांना पास केले, असा दावाही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या ट्विटमध्ये "आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धक्कादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आले आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा.फडणवीस साहेब पुरावे पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही देतो तसेच विखे पाटील साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

------

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर म्हणाले, ऋषी कुमार लोखंडे हे रिक्षा चालवतात. त्यांचा स्पर्धा परीक्षेची कोणताही संबंध नाही.तरीही ते तलाठी परीक्षेत टॉपर असून त्यांना 208 गुण मिळाले आहेत. अमोल विधाते हा त्यांचा मेव्हणा आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी. सत्य आपोआप बाहेर येईल.