राज्यातील आश्रमशाळांमध्ये उभारणार अत्याधुनिक विज्ञान केंद्र

आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉ़डेल निवासी शाळा, नामांकित शाळा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

राज्यातील आश्रमशाळांमध्ये उभारणार अत्याधुनिक विज्ञान केंद्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या आदिवासी विकास विभागातील (Tribal Developement Department) ७३ शासकीय आश्रमशाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान केंद्र (Science Centre) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २५० आदर्श आश्रमशाळांपैकी ७३ शाळांची या केंद्रासाठी निवड केली जाणार आहे. आश्रमशाळांमधील (Ashram Schools) विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉ़डेल निवासी शाळा, नामांकित शाळा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने शासनाने २५० आदर्श आश्रमशाळा नुकत्याच घोषित केल्या आहेत.

विद्यार्थ्यांनो, अनामत रक्कम परत घेताय ना? नाहीतर होतील खर्च, शासनाने ठरवले धोरण

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ सुत्री कार्यक्रम राबविण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत आदिवासी स्माटर् शाळांची उभारणी व ७३ विज्ञान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आदर्श शाळांमध्ये आधुनिक सुविधांसह विज्ञान केंद्रांचीही उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार विज्ञानविषयक अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात येईल.

 

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानातील महत्वाच्या विषयांबाबत माहिती देण्यासाठी आश्रमशाळांमध्ये अंतराळविषयक बाबी, यंत्रशाळा, टेलिस्कोप आदींची उभारणी केली जाईल. आवश्यकतेनुसार याबाबत तज्ज्ञ सल्लागारांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना अंतराळाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात येईल. विज्ञान केंद्र उभारण्याचे काम सुरू झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्याप्रमाणे शिक्षकांनी मार्गदर्शन करण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत सहा महिन्यांनी मूल्यांकन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला आयुक्तांना प्रगती अहवाल सादर करावा लागेल. ही योजना एक वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k