PGI 2.0 : शालेय शिक्षणात महाराष्ट्राची 'ग्रेड' घसरली, अध्ययन निष्पत्ती अन् गुणवत्तेत मागे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी PGI तयार केला आहे.

PGI 2.0 : शालेय शिक्षणात महाराष्ट्राची 'ग्रेड' घसरली, अध्ययन निष्पत्ती अन् गुणवत्तेत मागे
PGI 2.0

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील शाळांमधील डिजिटल शिक्षणासह विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी बाबींचे विश्लेषण करून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) 2.0 जारी केले आहे. या इंडेक्समध्ये महाराष्ट्राची (Maharashtra) कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आले आहे. PGI च्या यादीत महाराष्ट्राची कामगिरी मागच्या वर्षीच्या तुलनेत घसरली आहे. तर चंदीगड आणि पंजाब शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्य ठरली आहेत. (Performance Grading Index)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी PGI तयार केला आहे. हे इंडेक्स राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील शालेय शिक्षण प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करते. या इंडेक्समध्ये महाराष्ट्राला १ हजार पैकी ५८३.२ गुण मिळाले आहेत. तर गुजरात (५९९), केरळ (६०९.७), दिल्ली (६३६.२), पुद्दुचेरी (५९२.७) आणि तामिळनाडूला (५९०.४) गुण मिळाले आहेत.

विज्ञान, गणिताला शिक्षक आणायचे कुठून? ३ वर्षात केवळ तेराशे शिक्षक टीईटी उत्तीर्ण

देशात २०१७ पासून असे असे मूल्यमापन होत आहे. या इंडेक्समध्ये महाराष्ट्र २०१७ ते १९ च्या दरम्यान लेव्हल १ मध्ये होते, २०२०-२१ मध्ये राज्याचा समावेश लेव्हल २ मध्ये होता. तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्य तिसऱ्या लेव्हल मध्ये पोहोचले आहे. २०२१-२२ मध्ये कामगिरीत घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. टॉप टेन राज्यांच्य यादी महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे.

मुल्यमापनासाठी सहा गट निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता (LO), उपलब्धता (A), पायाभूत सुविधा (IF), समानता (E), प्रशासकीय प्रक्रिया (GP), शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण (TE & T) याआधारे मुल्यमापन करून राज्यांना दहा ग्रेडमध्ये विभागण्यात आले आहे. त्यासाठी गुण निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सातव्या म्हणजे प्रचेस्टा तीन या ग्रेसमध्ये आहे. विशेष म्हणजे देशातील एकही राज्य पहिल्या पाच ग्रेडमध्ये नाही. सहाव्या प्रचेस्टा दोन ग्रेडमध्येही केवळ दोनच राज्य आहेत.

महाराष्ट्राला मिळालेले गटनुसार गुण व ग्रेड (कंसात एकूण गुण)

गट प्राप्त गुण ग्रेड
अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता (२४०)          ६५.८ आकांशी १
उपलब्धता (८०) ६४.७ उत्कर्ष
पायाभूत सुविधा (१९०) ७३.४ प्रचेस्टा ३
समानता (२६०) २३३.४ उत्कर्ष
प्रशासकीय प्रक्रिया  (१३०) ७२.२ प्रचेस्टा १
शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण (१००) ७३.६ अति उत्तम

 

महाराष्ट्र अध्ययन निष्पत्ती व गुणवत्तेत मागे

अध्ययन निष्पत्ती व गुणत्तेमध्ये महाराष्ट्राची कामगिरी खराब असल्याचे दिसते. या गटात २४० पैकी केवळ ६५.८ गुण मिळाले असून महाराष्ट्र आकांशी १ या गटात गेला आहे. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा गटातही महाराष्ट्र मागे पडल्याचे दिसते. या गटात १९० पैकी ७३.४ गुण मिळाले असून प्रचेष्टा ३ गटात महाराष्ट्र आहे. शिक्षणाची उपलब्धता आणि समानता या गटांमध्ये मात्र महाराष्ट्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.

देशातील टॉप टेन राज्य

राज्य गुण ग्रेड
चंदीगड ६५९ प्रचेस्टा २
पंजाब ६४७.४ प्रचेस्टा २
दिल्ली  ६३६.२ प्रचेस्टा ३
केरळ ६०९ प्रचेस्टा ३
गुजरात ५९९ प्रचेस्टा ३
पुद्दुचेरी ५९२.७ प्रचेस्टा ३
तमिळनाडू ५९०.४ प्रचेस्टा ३
महाराष्ट्र ५८३.२ प्रचेस्टा ३
हरयाणा ५७७.९ आकांशी १
राजस्थान ५७७.५ आकांशी १

   

गुणांनुसार असे होते ग्रेडिंग

दक्ष - (९४१-१०००)

उत्कर्ष - (८८१-९४०)

अति उत्तम - (८२१-८८०)

उत्तम - (७६१-८२०)

प्रचेस्टा-१ - (७०१-७६०)

प्रचेस्टा-२ - (६४१-७००)

प्रचेस्टा-३ - (५८१-६४०)

आकांशी-१ - (५२१-५८०)

आकांशी-२ - (५६१-५२०)

आकांशी-३ - (४०१-४६०)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD