ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन; फुलेवादी विचारांसाठी वेचले आयुष्य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अभ्यासाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सध्या ते समता परिषदेचे उपाध्यक्ष होते.

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन; फुलेवादी विचारांसाठी वेचले आयुष्य
Prof. Hari Narke

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

फुलेवादी विचारांसाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके (Prof. Hari Narke) यांचे बुधवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी मुंबईला (Mumbai) जात असतानाच त्यांना त्रास झाला. त्यानंतर तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

समता चळवळीचे आघाडीचे शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अभ्यासाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सध्या ते समता परिषदेचे उपाध्यक्ष होते.

महाराष्ट्र राज्य साहित्य निर्मिती महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर पुरुषांवरील ग्रंथ संपादित केले होते. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील गरीब कुटुंबात १ जून १९६३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे बहुतांश शिक्षण पुण्यातच झाले.

महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ओबीसींच्या भवितव्यावर कुऱ्हाड, दलित साहित्याच्या शोधात, महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा आदी पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा आणि एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर या टीव्ही मालिकांचे लेखन त्यांनी केले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीमध्येही हरी नरके यांनी काम केले आहे. अभ्यासू व परखड वक्ते म्हणून ते परिचित होते. विविध व्याख्यानमालांमधून त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo