अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकित बिलांसह विविध प्रश्न मार्गी

गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक प्रकारची देयके थकित आहेत. आहार पुरवठादार महिला बचत गटांना देखील अनेक महिने आहाराचे अनुदान मिळालेले नाही.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकित बिलांसह विविध प्रश्न मार्गी
Anganwadi Workers demand

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक प्रकारची थकित देयके तसेच अन्य प्रश्नांबाबत अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi Workers) संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर विविध प्रश्न मार्गी लागल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्ष शुभा शमीम (Shubha Shamim) यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक प्रकारची देयके थकित आहेत. आहार पुरवठादार महिला बचत गटांना देखील अनेक महिने आहाराचे अनुदान मिळालेले नाही. थकित देयकांच्या यादीमध्ये दोन महिन्यांचे मानधन देखील जोडले गेले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जगणे कठीण झालेले आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सोमवारी अशा विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा : चूक समाजकल्याणची अन् शिक्षा विद्यार्थ्यांना: शिष्यवृत्तीचा हप्ता न मिळाल्याने महाविद्यालयांकडून अडवणूक

मार्चचे थकित मानधन २ दिवसांत तर वाढीव मानधनाहित एप्रिल महिन्याचे मानधन या महिना अखेरीपर्यंत देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. थकित सेवा समाप्ती लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. अंगणवाडीचे थकित भाडे मार्गी लागले आहे. तसेच वाढीव भाडे देण्यात येईल. आहाराच्या बिलाची मार्च पर्यंतची रक्कम पाठवण्यात आल्याचे शमीम यांनी सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष आरमायटी इराणी, कार्याध्यक्ष संगीता कांबळे, मुंबई अध्यक्षा स्नेहा सावंत, मीना मोहिते, विभावरी सारंगकर, सुप्रिया परब, सुप्रिया पवार, ज्योस्त्ना पोळ, आहार पुरवठादार बचतगटाच्या अरुणा रोडगे उपस्थित होते.

या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या :

  1. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन गेले दोन महिने थकित असून मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन तर कोलमडून पडले आहे.
  2. राज्यातील सुमारे ६०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन आधार जोडणी असून देखील, पीएफएमएस प्रणालीमधून खात्यात येण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांच्या खात्यात मानधन येत नव्हते. त्यांना काही महिने प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारा चेकने मानधन दिले जात होते, परंतु ही पद्धत आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना गेले ६ महिने मानधनापासून वंचित रहावे लागले आहे.
  3. नागरी भागातील अंगणवाड्यांचे भाडे सुमारे एक वर्षापासून थकित आहे. सर्व थकित भाडे तातडीने अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पाठवण्यात यावे. यापुढे दर महिन्याला नियमितपणे भाडे देण्यात यावे. अंगणवाडीच्या जागा अनेक कारणांमुळे सतत बदलत असतात त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यातच भाड्याची रक्कम पाठवण्यात यावी व ती मिळाल्याची पावती घरमालकांकडून घेण्यात यावी.
  4. एप्रिल २०२३ पासून अंगणवाडीच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांनुसार व वाढलेल्या दराप्रमाणे हे भाडे अदा करण्याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी.
  5. अनेक ग्रामीण प्रकल्पांमध्ये दोन ते अडीच वर्षे प्रवास व बैठक भत्ता दिला गेलेला नाही.
  6. आहाराचे अनुदान नागरी प्रकल्पात ताजा गरम आहार पुरवठा करणाऱ्या बचतगटांना गेले वर्षभर देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आहार शिजवणाऱ्या मदतनिसांना इंधन भत्ता देखील अशाच प्रकारे थकित आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2