राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ; २६ डिसेंबरपासून बालेवाडीत सुरूवात 

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ चे यजमानपद महाराष्ट्र राज्याकडे देण्यात आले आहे.

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ; २६ डिसेंबरपासून बालेवाडीत सुरूवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन (National Childrens Science Exhibition) विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.  या प्रदर्शनास विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभणार असल्याने सर्व विभागांनी आपापसात ताळमेळ ठेवून प्रदर्शन यशस्वी करावे, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे (Amol Yedge, Director, State Council of Educational Research and Training)यांनी केले. 

बाल विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात विविध विभागांतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत येडगे बोलत होते. या बैठकीस बैठकीला शिक्षण संचालनालय, महानगरपालिका, पेालीस विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : नवभारत साक्षरता कार्यक्रमाकडे दूर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभांगांची कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमोल येडगे  म्हणाले, ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ चे यजमानपद महाराष्ट्र राज्याकडे देण्यात आले असून चक्राकार पद्धतीने आयोजित या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये राज्य शासनाच्या, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय, अॅटोमिक एनर्जी केंद्रीय विद्यालय, तिबेटीयन विद्यालय तसेच सी.बी.एस.सी. व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संलग्न शाळा सहभागी  होणार आहेत. 

विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. १४-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून राष्ट्रीय स्तरावर पात्र झालेले विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. सुमारे ४०० विद्यार्थी आणि २०० शिक्षकांचा यामध्ये सहभाग असून प्रदर्शनासा दररोज सुमारे १० हजार विद्यार्थी भेट देण्याची शक्यता आहे. या प्रदर्शनाचा  विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येडगे यांनी केले आहे.