विद्रोह दाबता येणार नाही; रॅप साँग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची एंट्री

शुभम जाधव या रॅपरला बेकायदेशीररीत्या पोलीस ठाण्यात बसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुम्हाला विद्रोह दाबता येणार नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

विद्रोह दाबता येणार नाही; रॅप साँग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची एंट्री
NCP Leader Jitendra Awhad

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रॅप साँग (SPPU Rap Song Viral) प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी रॅप साँगची लिंक ट्विट करत पोलिसांवर निशाणा साधला आहे. शुभम जाधव (Shubham Jadhav) या रॅपरला बेकायदेशीररीत्या पोलीस ठाण्यात बसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुम्हाला विद्रोह दाबता येणार नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात राष्ट्रवादीच्या शहरातील एका पदाधिकाऱ्याने विद्यापीठाकडे या गाण्याविषयी तक्रार केली आहे. (Savitribai Phule Pune University News)

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील (Akash Zambare Patil) यांनीच पहिल्यांदा रॅप साँगबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या विद्यापीठ प्रशासनाने पोलीसांत तक्रार केली. या तक्रारीमध्ये संबंधित गाण्यातील सहभागी तरूणांची नावेही आहेत. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलीसांनी कारवाई करत तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत शुभम जाधवशी संवाद साधल्याचे म्हटले आहे. मात्र, विद्यापीठाने दिलेल्या तक्रारीमध्ये शुभम जाधव नावाचा एकही तरूण नाही. 

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

एकीकडे राष्ट्रवादीचेच पदाधिकारी संबंधित गाण्याविषयी तक्रार करत असताना आव्हाडांनी मात्र पोलिसांनी शुभमला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. आव्हाडांनी म्हटले आहे की, ‘शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन पुणे ह्यांनी ताब्यात घेतले आहे. जसे मला ह्याबद्दल समजले तसे मी शुभमला फोन केला. शुभमने समोर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला माझा फोन आहे असे सांगितले. समोरच्या पोलीस कर्मचाऱ्याने उध्दटपणाने मला बोलायचे नाही, असे उत्तर दिले. शुभमला मी सांगितले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर मला काढून दे. तर शुभमने त्यांना विचारले असता पोलीस कर्मचारी म्हणाला की, माझे वरिष्ठ अधिकारी मोकळे नाहीत. ते काही कोणाशी बोलणार नाहीत. मी शुभमला म्हटले फोन खाली ठेवून दे. एकतर बेकायदेशीररीत्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असे उध्दटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचे. शुभम हा बौध्द समाजातील मुलगा असून आंबेडकरी चळवळीत काम करतो.’

https://twitter.com/Awhadspeaks/status/1646805166090502144

आव्हाडांनी या ट्विटमध्ये पुणे पोलीसांसह राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही टॅग केले आहे. तुम्हाला विद्रोह दाबता येणार नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. आव्हाडांच्या या ट्विटमुळे आता हे प्रकरणात राजकीय रंग भरला आहे. त्यांनी ट्विटमध्ये गाण्याची लिंकही दिली आहे. पण त्यावरील व्हिडीओ डिलिट करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने याबाबत पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये सूरज गुट्टी, विशाल हंबे पाटील, विकी गायकवाड, शुभम दौंडकर, अवी मेंगाडे, ऋषिकेश फुले, पृथ्वीराज जाधव, दिग्दर्शक शुभम नंदकुमार राऊत, सिनेमॅटोग्राफर सागर कचवा व छायाचित्रकार श्रेयश शाळीग्राम यांची नावे आहेत. आव्हाडांनी नाव घेतलेल्या शुभम जाधव या तरूणाचे नाव नाही. मात्र, पोलीसांनी नेमके किती जणांना व कुणाला ताब्यात घेतले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे प्रकरण?

तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटली, ग्लास ठेवून विद्यापीठाच्या सभागृहात रॅप सोंग चित्रित करण्यात आले आहे. तसेच रॅप साँग मध्ये अश्लील शिव्यांचा भडीमार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इमारतीमध्ये व आवारामध्ये अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे पाटील यांनी उपस्थित केला होता. 'एज्युवार्ता'ने याबाबतचे वृत्त पहिल्यांदा प्रसिध्द केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला खडबडून जाग आली.