SPPU News : अखेर पदवीप्रदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे ठरले!

विद्यापीठाकडे एक लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

SPPU News : अखेर पदवीप्रदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे ठरले!
Dr Rajesh Gokhale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवी प्रदान (SPPU Graduation Ceremony) समारंभ येत्या १ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. समारंभ आठवड्यावर येऊन ठेपला तरीही प्रमुख पाहुणे निश्चित झाले नव्हते. अखेर या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सचिवांना बोलवण्याचे सोमवारी निश्चित करण्यात आले. (Dr Rajesh Gokhale will be the chief guest for the graduation ceremony)

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (VC Dr. Suresh Gosavi) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जी २० च्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी व्हावे लागले. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवावे याबाबत निर्णय घेणे शक्य झाले नाही. विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल रमेश बैस पदवी प्रदान समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अटल रँकिंगमधून बाहेर

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोखले हे पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी सीएसआयआर संस्थेचे संचालक पद ही भूषवले आहे.

दरम्यान, विद्यापीठाकडे सर्वाधिक इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या ४० हजार ६८ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. तसेच वाणिज्य विज्ञान आणि व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. विद्यापीठाकडे एक लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवारपासून; दीड महिन्यांचे वेळापत्रक

पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची  विद्याशाखा निहाय संख्या
 
कला : १ हजार ६६७
वाणिज्य : २८ हजार ५००
शिक्षणशास्त्र : २ हजार १४०
अभियांत्रिकी : ४० हजार ६८
विधी : ३ हजार १९९
व्यवस्थापनशास्त्र : १० हजार ६०३
मेंटल मोरल : ६ हजार ९१९
फार्मसी : ४ हजार ६६३
फिजिकल एज्युकेशन : ८८
विज्ञान : २३ हजार ३१२
तंत्रज्ञान : ३९

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2