आरटीईच्या जागा ७२, अर्ज आले तब्बल साडे तीन हजार

राज्यात एकाच शाळेसाठी सर्वाधिक अर्ज या शाळेसाठी आले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रवेशासाठीही सर्वाधिक चुरस राहणार आहे.

आरटीईच्या जागा ७२, अर्ज आले तब्बल साडे तीन हजार
RTE Admission News Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/ पुणे

दरवर्षी आरटीई प्रवेश (RTE Admission) प्रक्रिया कधी सुरू होणार, याची लाखो पालक आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या पाल्याला २५ टक्के आरक्षणाअंतर्गत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खासगी शाळेत प्रवेश मिळवा, अशी पालकांची इच्छा असते. काही ठराविक शाळांकडे पालकांचा ओढा असतो. तीच स्थिती यंदाही पाहायला मिळाली. शाळेमध्ये (RTE Lottery) शंभरापेक्षा कमी जागा असल्या तरी त्यासाठी दोन-तीन हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे त्यातून लॉटरी पध्दतीने प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांची धाकधुक वाढली आहे. (RTE Latest News Update)

राज्याच्या शिक्षण विभागाकडून बुधवारी आरटीई प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली. राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील एक लाख १ हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २ हजार १७२ अर्ज दुबार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी ३ लाख ६४ हजार ३९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी उरले. या अर्जांमध्ये एकाच शाळेसाठी तीन हजारांहून अर्ज आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. (RTE Admission News)

पुण्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या उड्या पडल्या आहेत. शाळेमध्ये आरटीईच्या २५ टक्के आरक्षणानुसार ७२ जागा आरक्षित आहे. त्यासाठी तब्बल ३ हजार ६०८ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात एकाच शाळेसाठी सर्वाधिक अर्ज या शाळेसाठी आले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रवेशासाठीही सर्वाधिक चुरस राहणार आहे. ऑनलाईन लॉटरी पध्दतीनुसार ३ हजार ६०८ अर्जांमधून केवळ ७२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड होणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशाबाबतचे संदेश नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविले जातील. (RTE News Update)

आरटीई लॉटरी निघाली, पालकांना तयार रहा!

पालकांना संदेश मिळाल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करायचा आहे. दरम्यान, राज्यात आरटीईच्या सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील ९३६ शाळांमध्ये १५ हजार ६५५ जागा असून त्यासाठी ७७ हजार ५३१ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल नागपूर जिल्ह्यात ३६ हजार ४९० अर्ज आहेत.

मुंबईत जवळपास १८ हजार, नाशिकमध्ये २२ हजार, ठाण्यात ३१ हजार तर छत्रपती संभाजीनगरमध्ये २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यात ४९ शाळांमध्ये २८७ जागा असून त्यासाठी केवळ २३२ अर्ज आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.