SPPU News : विद्यापीठाशी संलग्न ४० महाविद्यालये 'नॅक'कडे फिरकलीच नाहीत!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांची माहिती जमा करून त्याचा अहवालात तयार केला. त्यात काही महाविद्यालयांनी आपली प्रवेश क्षमता शून्य केली आहे.

SPPU News : विद्यापीठाशी संलग्न ४० महाविद्यालये 'नॅक'कडे फिरकलीच नाहीत!
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न असणाऱ्या सुमारे १०० महाविद्यालयांना नॅक (NAAC) मूल्यांकन न केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात सुमारे ४० ते ४२ महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न पुणे (Pune), अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (Savitribai Phule Pune University News)

 

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या नॅक (National Assessment and Accreditation Council) मूल्यांकनासाठी आग्रही भूमिका घेतली. राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर बैठक घेऊन संलग्न महाविद्यालयांचे मूल्यांकन करून घेणे आवश्यक असल्याबाबत चर्चा केली. तसेच तीन दिवसात नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटीस पाठवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांची माहिती जमा करून त्याचा अहवालात तयार केला. त्यात काही महाविद्यालयांनी आपली प्रवेश क्षमता शून्य केली आहे. तर काही महाविद्यालय नॅक मूल्यांकनासाठी पात्र ठरत नाहीत, अशा सर्व लहान मोठ्या बाबी समोर येत आहेत.

 

शिक्षक भरतीबाबत मोठी अपडेट : पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ, शिक्षण आयुक्तांची माहिती

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. त्यातच विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले नाही तर संबंधित महाविद्यालयांची संलग्नता विद्यापीठांना काढून घेता येते. त्यामुळेच सर्व महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची माहिती सादर करावी, असे आदेश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले होते. मात्र, विद्यापीठांकडून अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर विद्यापीठांनी याबाबतची माहिती जमा करून महाविद्यालयांना नोटिसा पाठवल्या आहेत.

 

पुणे विद्यापीठाशी संलग्न असणा-या सुमारे ४०- ४२ महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतले नाही. तर काहींनी दुस-यांना किंवा तिसऱ्या टप्प्यातील पुनर्मुल्यांकन करून घेतले नाही. त्यामुळे या महाविद्यालयावर विद्यापीठाकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच विद्यापीठाकडून कायदेशीर बाबी तपासून संलग्नता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j