पुणे विद्यापीठाच्या दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पूजन करून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून दिंडीने प्रस्थान केले.

पुणे विद्यापीठाच्या दिंडीचे  पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या दिंडीने मंगळवरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले असून, जी २०, वाय २०, युवा संवाद व पंचप्रण या विषयांच्या माहितीसह स्वच्छ, स्वस्थ, निर्मल, हरित आणि लोकशाही दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पूजन करून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून दिंडीने प्रस्थान केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्याच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन समिती सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आदित्य अभ्यंकर, संदीप पालवे, सागर वैद्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्‍वर कोठावळे, संचालक डॉ. सदानंद भोसले, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके आदी यावेळी उपस्थिती होते. 

युवा संवाद आणि पंचप्रण जनजागृतीचा मूलमंत्र प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्यक्ष पोहाचवणे, पर्यावरण संवर्धन जनजागृती, लोकशाही बळकट करण्यासाठी जनजागृती, आरोग्य प्रबोधन, सामाजिक व सांस्कृतिक सलोखा, लोकसंख्या नियंत्रण आदी संदर्भात पथनाट्य, भारूड, गवळण, अभंग, रिंगण आदी उपक्रम दिंडीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून युवकांचा वारकर्‍यांशी थेट संवाद होणार आहे. या दिंडीत २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या दिंडी बरोबरच निर्मलवारी अभियानाअंतर्गत वारकरी आणि गावकर्‍यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. वारीच्या मार्गावर दररोज रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीत विद्यापीठाचे १०० विद्यार्थी कार्यरत राहणार आहेत.

त्याबरोबर वारी मार्गावर भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यावरणीय व आरोग्यविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे संशोधन करून वारीमार्ग व परिसर आणि गावांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक आराखडा तयार केला जाणार आहे. विद्यापीठाच्या दिंडीचे हे १९ वे वर्ष आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागा आणि संवाद पुणे यांच्या वतीने सिनेअभिनेते योगेश सोमण यांच्या आनंदडोह या एकपात्री नाट्यप्रयोगाचे देहू ते पंढरपूर या मार्गावर आयोजन करण्यात आले आहे.