लढ्याला यश; गैरप्रकारांमुळे MPSC ने ऑनलाईनचा हट्ट सोडला, परीक्षा ऑफलाईनच होणार

आयोगाने दि. २० जानेवारी २०२३ तसेच २४ फेब्रुवारी २०२३ रोजी अनुक्रमे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२३ च्या जाहिराती प्रसिध्द केल्या होत्या.

लढ्याला यश; गैरप्रकारांमुळे MPSC ने ऑनलाईनचा हट्ट सोडला, परीक्षा ऑफलाईनच होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ (MPSC Exam) या दोन्ही परीक्षा ऑफलाईन (Offline Examination) म्हणजे पारंपरिक पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला (Online Examination) विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. 'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांच्या विरोधापुढे झुकत ऑनलाईनचा हट्ट सोडला आहे. दरम्यान, सध्या विविध ऑनलाईन परीक्षांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे आयोगाने वेळीच सतर्क होत हा निर्णय घेतल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

 

आयोगाने दि. २० जानेवारी २०२३ तसेच २४ फेब्रुवारी २०२३ रोजी अनुक्रमे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२३ च्या जाहिराती प्रसिध्द केल्या होत्या. त्यानुसार अनुक्रमे महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ मधील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचे जाहीर केले होते.

SPPU News : विद्यापीठाशी संलग्न ४० महाविद्यालये 'नॅक'कडे फिरकलीच नाहीत!

 

आयोगाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेतल्यास विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच ऑनलाईन परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत आहेत. याप्रकरणांमध्ये अनेकांना अटकही झाली आहे. असे गैरप्रकार एमपीएससीच्या परीक्षांमध्येही होण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांसह राजकीय नेत्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी केली होती.

 

अखेर आयोगाने गुरूवारी एक शुध्दिपत्रक काढून परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रशासकीय कारणास्तव विषयांकित दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल. महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ तसेच राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या आयोजनाचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही, असे आयोगाकडून पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPSC Result : कर सहायक, लिपिक-टंकलेखक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

 

आयोगाने परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी प्रशासकीय कारण दिले असले तरी ऑनलाईन परीक्षांमध्ये गैरप्रकारांमुळे आयोग सतर्क झाल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून गेला जात आहे. स्टूडंट्स राईट्स असोसिएशनचे महेश बडे म्हणाले की, आयोगाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. आयोगाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होत नाहीत. परीक्षा ऑनलाईन घेतली असती तर गैरप्रकार होण्याची भीती आहे. सध्या अनेक परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत असल्याने आयोग वेळीच सतर्क झाला, हे चांगले आहे.

 

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. MPSC आयोगामार्फत ऑफलाईन परीक्षेत पारदर्शकता आढळून आली आहे, त्यामुळे मुख्यच्या ऑनलाईन परीक्षेला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा विरोध होता. TCS कडून परीक्षा घेण्यासाठी आयोगाने प्रसिद्ध केलेले टेंडर आणि अटी आमच्याकडे होत्या, त्याचा अभ्यास आम्ही केला होता. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी आयोगाशी अनेकदा संपर्क केला होता आणि आज अखेर आयोगाने संयुक्त मुख्य परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला त्याबद्दल आयोगाचे आभार, असे समितीने म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j