शिक्षक भरती निवड यादीत नाव आले; तरीही दीड वर्षापासून नियुक्तीची प्रतीक्षा

६४५ उत्तीर्ण उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. हा मुद्दा आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उचलून धरला असून, शरद पवार यांना टॅग करून यांच्याकडून उमेदवारांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

शिक्षक भरती निवड यादीत नाव आले; तरीही दीड वर्षापासून नियुक्तीची प्रतीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरती डिसेंबर २०२२ च्या (Teacher Recruitment December 2022) टीएआयटी (शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी) (Teacher Aptitude and Intelligence Test) मध्ये उत्तीर्ण झालेल्या ११ हजारांहून अधिक उमेदवारांना जिल्हा परिषद, महानगरपालिका यासह विविध खाजगी संस्थांमध्ये नियुक्ती मिळाली. परंतु, रयत शिक्षण संस्थेतील (Rayat Education Institute) निवडक ६४५ भावी शिक्षकांना अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही. परीक्षा पास झाले, निवड यादीत नाव आले, तरीही मागील दीड वर्षापासून रयत संस्थेत निवड झालेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत (Selected 645 Candidates Awaiting Appointment in Rayat Sanstha) आहेत. त्यामुळे ६४५ उत्तीर्ण उमेदवारांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) हा मुद्दा उचलून धरला असून, शरद पवार यांना टॅग करून यांच्याकडून उमेदवारांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

रयत शिक्षण संस्थेत हजारो जागा रिक्त आहेत, २०२२ शिक्षक भरतीत प्रामाणिकपणे अभ्यास करून निवड यादीत आलेल्या उमेदवारांना, रयत शिक्षण संस्था नियुक्ती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.त्याबाबतची पोस्ट स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्स या आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट केली आहे. 

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती २०२२ मध्ये रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाही. रयत शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या कोर्ट प्रकरणामुळे या उमेदवारांना नियुक्ती मिळू शकलेली नाही. कोर्ट प्रकरण खरतर कंत्राटी शिक्षकांचे आहे, यात या उमेदवारांचा कोणताही संबंध नाही, असे पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

शिक्षण आयुक्त तसेच रयत शिक्षण संस्था कोर्टाकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे ६०० ते ७०० उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिक्षण आयुक्तांना यातून मार्ग काढत सदर उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सुरेश सावळे यांनी केली आहे.

दरम्यान,हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून ते त्वरीत निकाली काढण्यासाठी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे,असे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

----------------------------------------------------------------

 सध्या औरंगाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून, त्यावर आदेश येताच आम्ही तातडीने कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीपत्र देऊ. रयत शिक्षण संस्था सध्या स्थगिती उठवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

चंद्रकांत दळवी ( चेअरमन, रयत शिक्षण संस्था)