राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्याने वाद पेटला; संतप्त 200 कुलगुरूंनी लिहिले खुले पत्र..

केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेशी संबंधीत आहेत म्हणून त्यांची कुलगुरू पदी निवड करण्यात आली आहे.

राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्याने वाद पेटला; संतप्त 200 कुलगुरूंनी लिहिले खुले पत्र..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केलेल्या एका वक्तव्याने वाद पेटला आहे. देशभरातील तब्बल २०० संतप्त कुलगुरूंनी त्या संदर्भात खुले पत्र (An Open Letter from the Vice-Chancellor) लिहिले आहे. देशभरातील सर्व विद्यापीठातील कुलगुरू अपात्र आहेत. यांना काहीच येत नाही. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेशी संबंधीत आहेत म्हणून त्यांची कुलगुरू पदी निवड (post of Vice-Chancellor) करण्यात आली आहे. ते फक्त विचारांचे पाईक असल्याने त्यांच्या निवडी करण्यात आल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती.

देशातील विद्यापीठांमध्ये केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचीच भरती केली जात आहे. विशेषत:, कुलगुरूंची नियुक्ती करताना गुणवत्ता नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याच्या निकषावर निर्णय घेतला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. 

कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञांनी राहुल गांधी यांच्या या आरोपावर आक्षेप घेतला आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी कुलगुरूंनी लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील विद्यापीठांमध्ये भरती गुणवत्तेच्या आधारावर होत नसून संबंधित व्यक्ती रा. स्व. संघाशी संबंधित असल्याच्या आधारे होत असल्याच्या अफवा राहुल गांधी पसरवत आहेत. असे आम्हाला त्यांच्या ट्वीट आणि वक्तव्यावरून समजले आहे.

कुलगुरूंची नियुक्ती अत्यंत कठोर, पारदर्शक प्रक्रियेअंतर्गत केली जाते. त्यासाठी संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, हे पाहिले जाते. विद्यापीठाला पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे काय व्हिजन आहे आणि त्याची प्रशासकीय कार्यकुशलता किती आहे? हे पाहिले जाते. आमच्याकडे प्रोफेशनल अनुभव असतो आणि शैक्षणिक पात्रता देखील असते. निवड प्रक्रियेत हे लक्षात घेतले जाते, याकडे शिक्षणतज्ज्ञ आणि कुलगुरूंनी या पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

अशा काल्पनिक गोष्टी करू नका. कोणतेही तथ्य नसताना संभ्रम पसरवू नका, असे आम्हाला अशा सर्व लोकांना सांगायचे आहे. अशा अफवा पसरवल्याने शैक्षणिक वातावरण बिघडते. आमचा गुणवत्तेवर विश्वास आहे. उच्च शिक्षणासाठी हेच आवश्यक आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये झालेल्या सुधारणांचा दाखला देत कुलगुरूंनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत आश्चर्यकारक बदल झाले आहेत. आता आमच्या विद्यापीठांच्या जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. अशी विधाने करून राहुल गांधी यांनी उच्च शिक्षण संस्थांची बदनामी केली आहे,असे पत्रात म्हटले आहे.