NEP सुधारित अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्यावर शिक्कामोर्तब

अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्याची राज्यामध्ये एकसमान प्रमाणात अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व समूह विद्यापीठे आणि सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत.

NEP सुधारित अभ्यासक्रम  व श्रेयांक आराखड्यावर शिक्कामोर्तब

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीच्या  new education policy Implementation अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या शिफारशीनुसार सादर केलेला  अभ्यासक्रम आराखडा व श्रेयांक आराखडा राज्य शासनाने मंजूर केला आहे.  कला ,वाणिज्य, विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुधारित अभ्यासक्रम आराखडा व श्रीयंक आराखड्याची अंमलबजावणी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात येणार आहे. एआयसीटीई, पीसीआय,बीसीआय,सीओए एनसीटीई इत्यादी सारख्या नियमक संस्थांची मान्यता आवश्यक असलेले अभ्यासक्रम वगळून या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.      

  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने विविध उपसमित्या गठित करण्यात आल्या होत्या. या समित्यांच्या शिफारशी संदर्भातील आढावा घेऊन त्यातील अडचणी दूर करण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अंतरिम अहवालावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १९ व २० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये या अहवालावर सर्वांगाने चर्चा करण्यात आली. तसेच या अहवालाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्याची राज्यामध्ये एकसमान प्रमाणात अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व समूह विद्यापीठे आणि सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले, या बाबतचा अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आला.
     तीन / चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी मल्टिपल एन्ट्री आणि मल्टिपल एक्झिट पर्याय उपलब्ध असणार आहे. बी.ए. बी.एस्सी, बी.कॉम ,आणि एमए एमएस्सी, एम.कॉम या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी किती क्रेडिट असावेत, या संदर्भातील सविस्तर माहिती अध्यादेशात नमूद करण्यात आली आहे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे होणारे महत्त्वाचे बदल 

1)विद्यार्थ्याला  एका शाखेतून दुसऱ्या शाखेत जाण्याची लवचिकता
2) विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याची संधी
3)विद्यार्थ्यांना मल्टिपल एन्ट्री अणि मल्टिपल एक्झिटची संधी उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या क्रेडिटनुसार त्याला पदवी प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र किंवा तीन वर्षाची पदवी दिली जाणार आहे.

4)विद्यार्थ्याला अंतरविद्याशाखेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन त्याचे आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळणार आहे.