NEP: विद्यापीठ उशीरा जागे झाले; अभ्यासक्रम आराखडाच नाही तयार, प्रथम वर्षांचे प्रवेश देण्याचे आव्हान 

येत्या ५ जून रोजी विद्यार्थ्यांना बारावीच्या मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना काय सांगावे, असा सवाल प्राचार्यांसमोर उभा राहिला आहे.

NEP: विद्यापीठ उशीरा जागे झाले; अभ्यासक्रम आराखडाच नाही तयार, प्रथम वर्षांचे प्रवेश देण्याचे आव्हान 
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता बारावीचा निकाल (12th result ) जाहीर झाला असून आता प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास (first year degree admission process) सुरूवात होणार आहे. मात्र,यंदा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार  (National Education Policy) विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागणार आहेत. परंतु, त्या संदर्भातील अभ्यासक्रम आराखडा व विषय निहाय अभ्यासक्रम अद्याप विद्यापीठाने तयारच केले नसल्याने संलग्न महाविद्यालयांमध्ये (affiliated college of Pune University) विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा? असा मोठा प्रश्न प्राचार्यांसमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा : देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी १५० रडारवर, महाराष्ट्रात कोणती?

 नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात केली जाणार आहे. परंतु, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन व चार वर्षांचा अभ्यासक्रम कसा असेल?  विद्यार्थ्यांना विषयांची निवड कशी करता येईल ? याबाबत विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. येत्या ५ जून रोजी विद्यार्थ्यांना बारावीच्या मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना काय सांगावे, असा सवाल प्राचार्यांसमोर उभा राहिला आहे.मात्र, सर्व स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेला अभ्यासक्रम मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे केवळ इतर संलग्न महाविद्यालयांनाच यंदा प्रवेश कसे दिले जातील,या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. 

अधिक माहितीसाठी : SPPU : ललित कला केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू, या तारखेआधी भरा अर्ज     

                   
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळाच्या सदस्य नियुक्तीमध्ये चुका झाल्याचे समोर आल्या. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार नसल्याचे समोर आले. परंतु, आता विद्यापीठ प्रशासनातर्फे  युद्ध पातळीवर अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तयार करण्याबाबत वेगवान हालचाली कराव्या लागणार आहेत.


     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना तीन व चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे त्या संदर्भातील परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. परंतु, अद्याप अभ्यासक्रमच तयार झालेला नाही, विद्यार्थ्यांनी क्रेडिट मिळविण्यासाठी निवडलेल्या विषयांचे  शुल्क कसे आकारावे, हे निश्चित झालेले नाही. तसेच शिक्षकांचा वर्कलोड कसा असेल ? याबाबतही विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कल्पना दिलेली नाही. त्यामुळे यंदा नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात अडचणी येऊ शकतात, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त केले जात आहे.
-----------


'' विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला असून लवकरच तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच इयत्ता बारावीचे प्रवेश पूर्ण होण्यापूर्वी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्याचप्रमाणे प्राचार्य, संस्थाचालक या सर्वांमध्ये शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी विषयक जागृती करण्याबाबत कार्यशाळा घेतल्या जातील.''

- डॉ.एम.जी.चासकर,अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------------------------


नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाचे प्रवेश देण्यासंदर्भातील आराखडा व नियमावली त्याचप्रमाणे क्रेडिटसाठी विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क या संदर्भातील माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. चालू शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची  अंमलबजावणी करण्यात अडचणी येतील, असे वाटत नाही.


डॉ.विजय खरे, अधिष्ठाता, मानव्यविज्ञान, विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
--------------

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo