‘RTE’ प्रवेशाची लाॅटरी उद्या ; मात्र प्रवेशाची घोषणा १२ जूननंतर , काय आहे कारण

पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सभागृहात शालेय शिक्षण विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सोडत जाहीर करण्यात येईल.

‘RTE’ प्रवेशाची लाॅटरी उद्या ; मात्र प्रवेशाची घोषणा १२ जूननंतर , काय आहे कारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी येत्या शुक्रवारी (दि.७ जून) ऑनलाइन सोडत अर्थात लाॅटरी)काढण्यात येणार (Online lottery will be conducted) आहे.मात्र,आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयात याचिका दाखल असून त्यावरील सुनावणी १२ जून रोजी होणार आहे.इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पालकांना आरटीई प्रवेशासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (State Council of Educational Research and Training) सभागृहात शालेय शिक्षण विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता आरटीईची सोडत काढली जाणार आहे.या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. पालकांना घरी बसून आरटीई प्रवेशाची सोडत ऑनलाईन पाहता येणार आहे. 

राज्यातील 9  हजार 217 शाळांमधील 1  लाख 5 हजार 399 जागांवरील प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 972 अर्ज आले आहेत. लॉटरी काढली जाणार असली तरी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागाने पूर्वी केवळ शासकीय, अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये आरटीई प्रवेशाला प्राधान्य दिले होते.त्यामुळे काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आरटीईच्या जागा शिल्लक किंवा आरक्षित न ठेवता त्या जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.त्यामुळे या शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.आरटीईच्या याचिकेवर जून महिन्यात सुनावणी घेतली जाणार होती. त्यानुसार आता 12 जून रोजी या बाबत सुनावणी घेऊन निर्णय दिला जाणार आहे. 

शिक्षण विभागाने न्यायालयाने आरटीई प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यापूर्वी राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व माध्यमाच्या शाळांची आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करून घेतली होती.तरीही काही शाळांनी आरटीईच्या जागांवर प्रवेश दिल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.