राज्यातील पहिल्या क्लस्टर शाळेतील प्रवेशासाठी प्रशासन करणार विनवणी

जिल्हा परिषदेतर्फे येत्या ११ एप्रिल रोजी १३ शाळांना भेटी देऊन शाळेतील सोयीसुविधानाबद्दलचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना क्लस्टर शाळेत (Cluster School) पाठवण्याची विनंती केली जाणार आहे.

राज्यातील पहिल्या क्लस्टर शाळेतील  प्रवेशासाठी प्रशासन करणार विनवणी
Panshet Cluster School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क             

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच शाळेमध्ये (ZP School) प्रवेश देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पानशेत येथे उभ्या केलेल्या क्लस्टर शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास परिसरातील शाळा समित्यांनी अद्याप संमती दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतर्फे येत्या ११ एप्रिल रोजी १३ शाळांना भेटी देऊन शाळेतील सोयीसुविधानाबद्दलचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना क्लस्टर शाळेत (Cluster School) पाठवण्याची विनंती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी वापरल्या जाणा-या स्कूल बस मधूनच प्रवासात करत जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रत्येक शाळेचे शाळा समिती सदस्य व पालकांशी संवाद साधणार आहेत.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://www.eduvarta.com/

पानशेत येथे जिल्हा परिषदेतर्फे क्लस्टर स्कूल बांधण्यात आली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधांबरोबरच संगणकीय व परकीय भाषांचे ज्ञान देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. या शाळेकडे एक रोड मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. पानशेत क्लस्टर स्कूल परिसरातील सुतारवाडी जिल्हा परिषद शाळेतील १८ विद्यार्थी, देशमुखवाडी शाळेत ४, पडळवाडी शाळेतील ४, वरसगाव शाळेत ३ , घिवशी शाळेतील १, आंबेगाव शाळेतील १, चिमकोडी शाळेत ७, वाडघर शाळेत ११, शिर्के वाडीतील १०, कुरण बुद्रुक शाळेमधील १२ विद्यार्थी, मधली वाडी शाळेतील ७, वरची वाडीतील ४, कुरण खुर्द मधील २३ विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. 

क्लस्टर स्कूलसाठी प्रत्येक शाळेच्या शाळा समितीची मान्यता संमती असणे गरजेचे आहे. त्यासाठीच ११ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रत्येक शाळांना भेट देणार आहेत. क्लस्टर स्कूलपासून या सर्व शाळा जास्तीत जास्त १६ आणि कमीत कमी ३ किलो मीटर अंतरावर आहेत. त्यांना ने आण करण्यासाठी स्कूलबस दिली जाणार आहे. ही बस शाळा समितीतील सदस्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना दाखविली जाणार आहे.

हेही वाचा : ZP शाळेतील पोरं हुशार; थेट 'नासा'मध्ये पडणार पाऊल

विद्यार्थ्यांना क्लस्टर शाळेत पाठवाच असे कोणतेही बंधन पालकांवर लादले जाणार नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३८ शाळा आहेत. त्यातील १ हजार ५४ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये एकूण १२ हजार ८९८ विद्यार्थी शिक्षण घेतात.त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच दर्जेदार शाळेत प्रवेश देण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.  

कुणावरही दबाव नाही
जिल्हा परिषदेने कधीही क्लस्टर शाळेतच प्रवेश घ्या असा दबाव कोणावर आणला नाही. ज्या पालकांना आपल्या मुलांना या शाळेत पाठवायचे आहे. त्यांना शाळेतर्फे दिल्या जाणा-या दर्जेदार शिक्षणाची आणि स्कूलबस मधील अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी ११ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रत्येक शाळांना भेट देणार आहेत.                
- पंकज पाटील, महात्मा गांधी नॅशनल फेलो आणि क्लस्टर स्कूल  प्रकल्प समन्वयक