पदवीधर प्राथमिक शिक्षकांना लॉटरी; पदोन्नतीनंतर वेतन निश्चितीबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. काही जिल्हा परिषदांकडून वेतनवाढ दिली जात नव्हती.

पदवीधर प्राथमिक शिक्षकांना लॉटरी; पदोन्नतीनंतर वेतन निश्चितीबाबत मोठा निर्णय
ZP School Representative Image

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

पदवीधर प्राथमिक शिक्षकास (Primary Teacher) पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी, असे आदेश राज्य शासनाने (Maharashtra Government) दिले आहेत. काही जिल्हा परिषदांकडून (Zilla Parishad) अशी वेतनवाढ दिली जात नसल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत शासनाने वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. (Rural Devlopment Department)

 

ग्राम विकास विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळल्यानंतर, काही जिल्हा परिषदा वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ नियम ११ (१) (अ) नुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या.

राज्य सरकारची नजर आता आश्रमशाळांवर; २५० शाळांना ‘आदर्श’ करणार

पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सेवाज्येष्ठता / गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषांवर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक १८ नोव्हेंबर १९८८ च्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे. पदवीधर प्राथमिक शिक्षक हा त्यास संबंधित शाळेत नेमूण दिलेल्या विषयाच्या अध्यापनापुरता मर्यादित असतो. तो इयत्ता ६ ते ८ मधील विशिष्ट विषयांचे अध्यापनाचे कामापुरता मर्यादित असतो.

 

परंतू, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून त्यांना दर आठवडयात किमान १८ तास अध्यापन करणे बंधनकारक आहे व उर्वरित कालावधीत त्याला संबंधित शाळेचे प्रशासन व संनियंत्रण हाताळावे लागते. तसेच केंद्रप्रमुखास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहीक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे पदवीधर पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकांचे व केंद्रप्रमुखाचे उपरोक्त कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास केंद्रप्रमुख अथवा पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

 

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) तील तरतूदीनुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे कामकाज लक्षात घेता पदवीधर प्राथमिक शिक्षकास पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चित करताना एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j