आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांसाठी धावले ; आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना वसतीगृह देण्याची विद्यापीठाकडे मागणी

प्रवेश मिळून 47 दिवस झाले तरीही  वसतिगृह मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेतली. त्यावर चार दिवस उलटून गेल्यानंतर काहीही उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले.

आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांसाठी धावले ; आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना वसतीगृह देण्याची विद्यापीठाकडे मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्र अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह द्यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन केल्याचे छायाचित्रही त्यांनी प्रसिद्ध केले आहे. दिवसेंदिवस विद्यापीठातील वसतिगृहाचा प्रश्न गंभीर होत चालला असल्याचे यामुळे निदर्शनास येत आहे.

हेही वाचा : शिक्षण राज्यात आणखी दोन खासगी विद्यापीठे; डीईएस, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठांचा मार्ग मोकळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही. पूर्वी विद्यापीठातील वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये दुसऱ्या एका विद्यार्थ्याला गेस्ट म्हणून राहण्याची परवानगी दिली जात होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ही परवानगी बंद करण्यात आली आहे. त्यातच वसतिगृह क्रमांक पाच काही दिवसांसाठी बंद असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.त्यामुळे यातील तथ्य तपासून विद्यार्थ्यांना वसतीगृह द्यावे, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. 

 विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात  यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. त्यात गुणवत्तेच्या आधारे खुल्या संवर्गातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी वसतिगृहात प्रवेश दिला जात होता. मात्र या वर्षापासून हा प्रवेश बंद करण्यात आला असल्याचे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रवेश मिळून 47 दिवस झाले तरीही वसतिगृह मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेतली. त्यावर चार दिवस उलटून गेल्यानंतर काहीही उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालय समोर रात्री उशीरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान,  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडून याबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

 -------------
शासनाच्या इतर संस्थांमधील प्रवेश पूर्व परीक्षा सोडून आम्ही विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्र प्रवेश मिळावा यासाठी अभ्यास केला. परंतु प्रवेश मिळूनही विद्यापीठात वसतिगृह मिळत नसल्याने आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील महिन्यात यूपीएससी व एमपीएससी मेन्स परीक्षा आहे. वसतिगृह न मिळाल्याने या परीक्षेच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलन केले, असे एका विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.