गतिमान सरकारचे आरटीई संकेतस्थळ 'फेल'; शिक्षणमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी

आता विविध संस्था-संघटनांकडून थेट शिंदे सरकारच्या कारभारावरच टीका सुरु झाली आहे. आप (AAP) पालक युनियनने गतिमान, वेगवान सरकार म्हणत टोला लगावला आहे.

गतिमान सरकारचे आरटीई संकेतस्थळ 'फेल'; शिक्षणमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी
RTE Website

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ सलग दुसऱ्या दिवशीही तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिक्षण विभागातील (Education Department) अधिकारीही हतबल झाले असून विद्यार्थी-पालक संभ्रमात आहेत. त्यावरून आता विविध संस्था-संघटनांकडून थेट शिंदे सरकारच्या कारभारावरच टीका सुरु झाली आहे. आप (AAP) पालक युनियनने गतिमान, वेगवान सरकार म्हणत टोला लगावला आहे.

आरटीईचे प्रवेश बुधवारी दुपारी ४ वाजता ऑनलाइन लॉटरीद्वारे दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. परंतु, दुपारपासून आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ बंद (website down) पडल्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही हे अनेक पालकांना समजू  शकले नाही. शिक्षण विभागाकडून संकेतस्थळ सुरू करण्याची प्रयत्न केले जात आहे. पण गुरूवारीही हीच स्थिती कायम राहिल्याने आता पालकांचा संताप वाढू लागला आहे.

हेही वाचा : बोगस शाळांवर शेवटचा हातोडा; शिक्षण आयुक्तांचे शाळा बंद करण्याचे आदेश

याबाबत आप पालक युनियनने टीका केली आहे. युनियनचे मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांनी ट्विट करत विभागाला धारेवर धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरटीई लॉटरी संदर्भातील माहिती, ज्यांना प्रवेश मिळाले त्यांचे ऍडमिट कार्ड हे मिळण्यासाठी वेबसाईट वरती जावे लागते. परंतु कालपासून वेबसाईट बंदच आहे. हेवी ट्रॅफिक लोड असल्याचे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षामध्ये डेटाबेस नॉट कनेक्टेड असा मेसेज येत आहे.

वर्षानुवर्षे हे सॉफ्टवेअर वापरले जात असून त्याच्यातल्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जात नाहीत हे अनाकलनीय आहे. पालकांना यामुळे मनस्ताप होत असून एसएमएस न मिळाल्यामुळे अस्वस्थता आहे. हा प्रश्न लाखो पालकांचा असल्याने याबाबत शिक्षण मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा अथवा आपल्याला प्रशासकीय सेवा देता येत नसल्याचे जाहीर करावे, अशी टीका किर्दत यांनी केली आहे.