B. Pharmacy Admission : फार्मसी कॉलेज उघडण्यास ऑक्टोबर उजाडणार? प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

सीईटी सेलकडून बहुतांश सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. परंतु, अद्याप बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही.

B. Pharmacy Admission : फार्मसी कॉलेज उघडण्यास ऑक्टोबर उजाडणार? प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
B. Pharmacy Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (Pharmacy Council of India) फार्मसी महाविद्यालयांना (Pharmacy College) मान्यता देण्याच्या प्रक्रियेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) येत्या ३० ऑगस्टपर्यंत मुदत मिळवली आहे. तसेच संबंधित महाविद्यालयांना मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे फार्मसी महाविद्यालयांचे २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, तत्पूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी अशी मागणी संस्थाचालकांकडून केली जात आहे. (Admissions 2023)

सीईटी सेलकडून बहुतांश सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. परंतु, अद्याप बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (सीईटी-सेल) दररोज फार्मसीचे प्रवेश केव्हा सुरू होणार? याबाबतची माहिती पालक व विद्यार्थी विचारात आहेत.

Diploma Admission : फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

सीईटी-सेलकडून प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, एग्रीकल्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नोंदणी पूर्ण होत आली आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने महाविद्यालयांच्या मान्यतेला व नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मुदत मिळविल्याने यंदा फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील वर्षी सुद्धा फार्मसी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होण्यास नोव्हेंबर महिना उजाडला होता. त्यामुळे यंदाही प्रवेश उशिरा होणार असल्याचे बोलले जात आहे.         

नोंदणी तात्काळ सुरू करा                    

''फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने यापूर्वी मान्यता मिळालेल्या जागांवरील प्रवेश प्रक्रिया थांबवण्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे सीईटी सेलने बी.फार्मसीसाठीची प्रवेश नोंदणीची प्रक्रिया तात्काळ सुरू करायला हवी. विनाकारण प्रवेश प्रक्रियेस विलंब करू नये. नवीन मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना पुढील फेऱ्यांमध्ये समाविष्ट करता येऊ शकते. त्यामुळे सीईटी सेलने विद्यार्थ्यांच्या अर्जांची नोंदणी व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू करावी.''

- रामदास  झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD