Pune News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची भरती केली जात आहे. या भरतीला विविध स्तरांवरून विरोध होत असला तरी भरती प्रक्रिया सुरूच आहे.

Pune News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती सुरू
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

कंत्राटी शिक्षक भरतीसह राज्य सरकारच्या विविध निर्णयांविरोधात पुण्यात नुकताच विविध संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर काही दिवसांतच पुणे जिल्हा परिषदेने (Pune ZP) शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचा (Contractual Teachers Recruitment) निर्णय घेतला आहे. तालुका स्तरावरून ही भरती होणार असून निवृत्त शिक्षकांची दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत करार पध्दतीने नियुक्ती केली जाणार आहे.

 

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची भरती केली जात आहे. या भरतीला विविध स्तरांवरून विरोध होत असला तरी भरती प्रक्रिया सुरूच आहे. शिक्षक भरती होईपर्यंतच ही नियुक्ती  असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असली तरी विलंब लागत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढतच चालली आहे.

मोठी बातमी : पुढील वर्षीपासून सर्व शाळांमध्ये ‘एक राज्य एक गणवेश’, शासन निर्णय जारी

 

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत सर्व गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या दि ७ जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद शाळांमधील उपशिक्षकांच्या रिक्त  पदांवर पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत भरती केली जाणार आहे.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खाजगी अनुदानित शाळांमधून सेवानिवृत्त होऊन सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या शिक्षकांमधून करार तत्वावर मासिक २० हजार रुपये मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यात येणार  असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. शाळानिहाय रिक्त पदांची माहिती, अर्जाचा नमूना आदी बाबी गट शिक्षणाधिकारी पंचायत समितीस्तरावर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे समक्ष किंवा टपालातून दि. २६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

 

पंचायत समिती स्तरावर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र शिक्षकांची निवड केली जाईल. शाळानिहाय निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यासाठी समितीच्या शिफारशीसह ही यादी जिल्हा परिषदेकडे सादर केली जाईल. जिल्हा परिषद स्तरावरून नियुक्ती आदेश काढण्यात येतील. त्याआधी या उमेदवारांकडून हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k