देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत ; मुख्यमंत्र्यांची मंजूरी

समुद्रावर अभ्यास (रिसर्च) करायचा असेल तर देशातील विद्यार्थ्यांना रत्नागिरीत यावे लागणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

देशातील पहिले सागरी विद्यापीठ रत्नागिरीत ; मुख्यमंत्र्यांची मंजूरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील पहिले सागरी विद्यापीठ (Indias first maritime university in Ratnagiri) आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरी येथे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यास मंजुरी (Approval of Maritime University) दिली. तब्बल ६०० कोटींचा हा प्रकल्प असून त्यासाठी सुमारे ५० एकर जागेची आवश्यकता आहे. समुद्रावर अभ्यास (रिसर्च) करायचा असेल तर देशातील विद्यार्थ्यांना रत्नागिरीत यावे लागणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शासकीय विधी महाविद्यालयालाही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मी दिलेल्या आश्वासनापैकी शेवटच्या दोन्ही आश्वासनाची वचनपूर्ती झाली आहे. सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यायासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून आग्रही होतो, असे सामंत म्हणाले.  

सागरी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ असणार आहे आणि ते रत्नागिरीत स्थापण करण्यात येणार आहे. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. जेव्हा सागरी विद्यापीठ मंजूर होईल, तेव्हा तालुक्यातील ५० एकर शासकीय जागा देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शासकीय विधी महाविद्यालयाला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प देखील २५ कोटींचा आहे. दोन्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीला देखील तत्वतः मान्यता मिळाली आहे. लवकरच याचा अध्यादेश निघेल. समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीत आता संधी उपलब्ध झाली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मानाची बाब आहे, असे  मंत्री सामंत यांनी सांगितले.