नापास म्हणून अवहेलना झाली अन् जिद्दीने बनले ‘कोहिनूर’

नापास विद्यार्थ्यांच्या यशाचा प्रवास ‘ना- पासांतील कोहिनूर’ या पुस्तकातून गुंजाळ यांनी उलगडला आहे. पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी पुण्यात झाले.

नापास म्हणून अवहेलना झाली अन् जिद्दीने बनले ‘कोहिनूर’
Anil Gunjal book Publication Ceremony

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दहावीत बोर्डाच्या (SSC Examination) गणिताच्या पेपरमध्ये नापास झाल्यानंतर सोलापूरातील (Solapur) दिपाली साठे यांना समाजाकडून होणारी अवहेलना सोसावी लागली. परंतु त्यांनी खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवले आणि आता त्या पुण्यातील (Pune) एका खासगी रुग्णालयात चांगल्या पगाराची नोकरी करत आहेत. दिपाली यांच्यासारखे कितीतरी कोहिनूर असतात ज्यांना सुरूवातीला अपयश भेटते व नंतर मात्र ते यशाच्या शिखरावर पोहचतात. हे कोहिनूर (Kohinoor) शोधले आहेत, माजी शिक्षणाधिकारी व लेखक अनिल गुंजाळ (Anil Gunjal) यांनी.

नापास विद्यार्थ्यांच्या यशाचा प्रवास ‘ना- पासांतील कोहिनूर’ या पुस्तकातून गुंजाळ यांनी उलगडला आहे. पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी पुण्यात झाले. जेष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म जोशी, माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक विशाल सोळंकी आदी यावेळी उपस्थित होते. शिक्षणात विविध टप्प्यांवर अपयश येऊनही पुढे यश मिळविलेल्या काही जणांही यावेळी उपस्थित राहून आपले अनुभव सांगितले.

हेही वाचा : शिक्षण पध्दत विनाकारण बदलू नका : मंत्री केसरकरांच्या वक्तव्याने वाढणार संभ्रम

नापास झालेल्या विद्यार्थ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सर्वांनी बदलला पाहीजे आणि त्यांचे पाठबळ वाढवले पाहिजे, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. दिगंबर जोशी यांनी पुस्तकालबद्दल बोलताना नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडे शाळेमध्ये दुर्लक्ष केले जाते, या मुद्द्याकडे लक्ष वेधले. साधारण एखादा विद्यार्थी नापास झाल्यानंतर शिक्षक त्याच्याकडे नीट लक्ष देत नाहीत. परंतु शिक्षकांनीच या विद्यार्थ्यांच्या अभ्यासकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि त्यांची प्रगतीची वाटचाल सुरू करून द्यावी, असे आवाहन जोशी यांनी शिक्षकांना केले.

ना-पासांतील कोहिनूर या पुस्तकात नापास मुले यशस्वी कशी होतात, अशा चोवीस मुलांच्या चोवीस कहाण्या देण्यात आल्या आहेत. समाजामध्ये एखादा विद्यार्थी नापास झाल्यानंतर तो विद्यार्थी जीवनात अयशस्वी झाल्याच्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जाते. नापास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे अगदी पालकसुद्धा दुर्लक्ष करतात. या नापास मुलांच्या नावामागे लागलेला ढ-गोळा हा ठपका पुसून काढण्याच्या हेतूनेच अनिल गुंजाळ यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.