शिक्षण पध्दत विनाकारण बदलू नका : मंत्री केसरकरांच्या वक्तव्याने वाढणार संभ्रम

भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा, असे केसरकर म्हणाले आहेत.

शिक्षण पध्दत विनाकारण बदलू नका : मंत्री केसरकरांच्या वक्तव्याने वाढणार संभ्रम
School Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशातील शिक्षण पध्दतीत (Education System) आमुलाग्र बदल प्रस्तावित आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत त्याची अंमलबजावणीही सुरू केली जाणार आहे. त्यातच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी शिक्षण पध्दत विनाकारण बदलू नका, असे वक्तव्य केले आहे. NEP 2020 मध्ये अनेक बदल सुचविलेले असताना केसरकर यांनी थेट अधिकाऱ्यांनाच दिलेल्या या सुचनेमुळे संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (Balbharati) नियामक मंडळाची २५१ वी सभा बुधवारी केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, बालभारतीचे संचालक व माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : क्लस्टर शाळा हव्या की नको? तज्ज्ञांमध्ये टोकाचे मतभेद

या सभेमध्ये अधिकाऱ्यांना सुचना करताना केसरकर यांनी शिक्षण पध्दतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे. विद्यार्थ्यांना हसत – खेळत शिकवताना झालेला अभ्यास कायम लक्षात राहतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याचे आवाहन केसरकर यांनी केले. जगात ज्या चांगल्या शिक्षण पद्धती आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी जाणून घेता याव्यात याअनुषंगाने एक संग्रहालय तयार करावे, असे सांगून हे संग्रहालय संशोधनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : मागासवर्गीय शिष्यवृत्तीबाबत मोठी अपडेट; सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

 सर्व शाळा इंटरनेटशी जोडणार

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटशी जोडल्या जाणार आहेत. यासाठी दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री केसरकर यांनी यावेळी केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध करून देण्यात येणारी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तके देखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.