शिक्षकांच्या वारंवार बदल्यांची प्रथा थांबणार; स्थानिक भागातच नोकरीला प्राधान्य
प्रशिक्षणाची गुणवत्ता, भरती, नेमणूक, सेवेच्या अटी आणि शिक्षकांचे सक्षमीकरण या बाबी जशा असायला हव्यात तशा नाहीत आणि यामुळे शिक्षकांची गुणवत्ता व प्रेरणा अपेक्षित निकषांपर्यंत पोहोचत नाही.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (NEP 2020) शिफारशींनुसार शाळांमधील शिक्षकांच्या (Teachers) वारंवार बदल्या थांबविल्या जाणार आहे. ही हानीकारक प्रथा बंद केली जाईल, असे धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे B.Ed. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक क्षेत्रात प्राधान्याने नोकरी देण्याचाही शिफारशींमध्ये समावेश आहे. (Teachers Recruitment)
शिक्षकांच्या वारंवार बदल्या करण्याची हानिकारक प्रथा थांबवली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याचे रोल मॉडल आणि शैक्षणिक वातावरण यात सातत्य राहील. शिक्षकांच्या बदल्या अगदी विशेष परिस्थितीत आणि राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने योग्यपणे निर्धारित केलेल्या रचनात्मक पद्धतीनुसारच होतील. शिवाय, ऑनलाईन संगणकीय प्रणालीने बदल्या करण्यात येतील, ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होईल.
शाळेत गणित अन् विज्ञानाला पर्यायी विषय हवेत का?
प्रशिक्षणाची गुणवत्ता, भरती, नेमणूक, सेवेच्या अटी आणि शिक्षकांचे सक्षमीकरण या बाबी जशा असायला हव्यात तशा नाहीत आणि यामुळे शिक्षकांची गुणवत्ता व प्रेरणा अपेक्षित निकषांपर्यंत पोहोचत नाही. शिक्षकांबद्दलचा उच्च आदर आणि शिक्षकी पेशाचा उच्च दर्जा पूर्ववत व्हायला हवा जेणेकरून सर्वोत्कृष्ट व्यक्तींना शिक्षक बनण्याची प्रेरणा मिळेल. त्यादृष्टीने नवीन धोरणामध्ये शिफारशी करण्यात आल्या आहेत.
उत्कृष्ट विद्यार्थी, विशेषतः ग्रामीण भागातील, शिक्षकी व्यवसायात प्रवेश घेतील हे सुनिश्चित करण्यासाठी, चार वर्षांच्या दर्जेदार एकात्मिक B.Ed. कार्यक्रमांचा अभ्यास करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात गुणवत्ता-आधारित शिष्यवृत्त्या सुरू केल्या जातील. ग्रामीण भागात खास गुणवत्ता-आधारित शिष्यवृत्त्यांची स्थापना केली जाईल, ज्यामध्ये B.Ed. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्याथ्र्यांना त्यांच्या स्थानिक क्षेत्रात प्राधान्याने नोकरी देण्याचादेखील समावेश असेल, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागांमध्ये, विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षकांची तीव्र कमतरता असलेल्या भागांमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) दिले जाईल. ग्रामीण शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठीचे प्रमुख प्रोत्साहन म्हणजे शाळेच्या जवळपास किंवा शाळेच्या आवारात स्थानिक निवासाची सोय करणे किंवा वाढीव घर भत्ता देणे, अशी महत्वपूर्ण शिफारस धोरणात करण्यात आली आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.