सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार
"देशात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि विकासाच्या मूलभूत गोष्टी रुजविण्याचे काम सीए करत असतात. खर्चाची बचत, उद्योगांत वाढ व नफा मिळवून देण्यात सीए योगदान देतात. त्यांच्या सूक्ष्म व धोरणात्मक नियोजनातून कोणत्याही उद्योगाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे शिल्पकार असून देशाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. केवळ कर सल्लागार म्हणूनच नव्हे, तर धोरणात्मक सल्लागार, संशोधक आणि विश्वासार्हता निर्माण करणारे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्वाचे आहे," असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, 'आयसीएआय' पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 'नवोन्मेष २०२५', या सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास 'डब्ल्यूआयआरसी' व परिषदेचे चेअरमन सीए केतन सैया, उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, खजिनदार सीए फेनील शाह, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, सीए अभिषेक धामणे, सीए विजेंद्र जैन, सीए राकेश शहा, 'आयसीएआय'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, "देशात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि विकासाच्या मूलभूत गोष्टी रुजविण्याचे काम सीए करत असतात. खर्चाची बचत, उद्योगांत वाढ व नफा मिळवून देण्यात सीए योगदान देतात. त्यांच्या सूक्ष्म व धोरणात्मक नियोजनातून कोणत्याही उद्योगाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते. प्रत्येक भारतीयाचे आर्थिक आरोग्य सांभाळणाऱ्या सनदी लेखापालांचे कौतुक वाटते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रणालींमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. सनदी लेखापालांनी स्वतःला अद्ययावत ठेवून हे नवे बदल समजून घ्यायला हवेत."
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. सनदी लेखापाल व्यावसायिकांसाठी करसुधारणा, वित्तीय तयारी, ऑडिट यंत्रणा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 'भारतीय उत्पन्न कर व्यवस्थेतील बदलते परिदृश्य', 'स्टॅच्युटरी ऑडिटपासून फॉरेन्सिक ऑडिटकडे बदलत्या जबाबदाऱ्या', 'व्यावसायिक ब्रँडिंग - प्रॅक्टिशनर ते थॉट लीडर', 'एआय ऑटोमेशन व सीए क्षेत्रातील बदल', 'जीएसटीतील महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम', 'आयपीओ रेडिनेस व भांडवली बाजाराचे भविष्य' व 'स्टार्टअप फिनान्सिंग: २०२५ मध्ये सीएंना आवश्यक माहिती' या विषयावर तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे झाली.
"सीए केतन सैय्या म्हणाले, "आपला व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणारा आहे. त्यामुळे सतत नवनव्या गोष्टी आत्मसात करून आर्थिक प्रगती कशी साधता येईल, याचा विचार केला पाहिजे. सनदी लेखापालांना चांगले व्यासपीठ व सेवा मिळाव्यात, यासाठी संस्थेकडून न्यायसेतू, भाग्योदय, निर्यात सेवा, चाणक्यनीती, टेकएज, सप्तर्षी यांसारखे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. व्यापक विचार, नव्या संधी आणि ज्ञानात भर घालण्यासाठी अशा स्वरूपाच्या परिषदा महत्वाच्या ठरतात."
'आयसीएआय'च्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, 'विकासा' चेअरपर्सन सीए प्रज्ञा बंब, व्यवस्थापन समिती सदस्य सीए हृषीकेश बडवे, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, सीए सारिका दिंडोकार, पिंपरी-चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, 'विकासा' चेअरपर्सन सीए धीरज बलदोटा, व्यवस्थापन समिती सदस्य सीए सचिन ढेरंगे व सीए शैलेश बोरे यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सीए गायत्री खानवलकर, अंतरा मिणियार व माही जोशी यांच्या मोहक नृत्य गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीए सचिन मिणियार दोन दिवसीय परिषदेचे महत्व विशद केले. सीए वैभव मोदी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. खजिनदार सीए नेहा फडके व पिंपरी चिंचवड 'विकासा' शाखेचे चेअरपर्सन सीए धीरज बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
--------------------