क्रांतीवीर बिरसा मुंडा संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान : माजी मंत्री डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. धोंडीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या समितीच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या सारख्या जननायकांचा इतिहास केवळ पुस्तकात न राहता, तो मनात उतरायला हवा आणि जनतेला दिशा दाखवणाऱ्या अशा जननायकांची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.तसेच "बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत," असेही त्या म्हणाल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इरावती कर्वे संकुलातील सभागृहात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी भारती पवार बोलत होत्या. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. धोंडीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या समितीच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. अविनाश आडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, कार्यशाळेतील प्रमुख वक्ते वैभव सुरुंगे आदी उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजातील योगदान, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे महत्त्व, आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेली लढाई याचे मार्मिक शब्दांत स्मरण केले.
कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना निसर्गाचे केवळ ज्ञान नव्हते, तर त्यांचं त्याच्याशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की जल, जंगल आणि जमीन ही केवळ उपयुक्त संसाधने नाहीत, तर मानवाच्या सांस्कृतिक, सामाजिक अस्तित्वाची मूलभूत शिखर आहेत. त्यांनी आपल्याला दिलेले पारंपरिक ज्ञान, रीतिरिवाज आणि निसर्गाचा सन्मान हाच पर्यावरणसंवर्धनाचा खरा मार्ग आहे."
वैभव सुरुंगे यांनी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या इतिहासातील योगदानावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी बिरसा मुंडा यांच्या लढ्याचा समाजावर व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर झालेला प्रभाव विशद केला. त्यांनी जनजाती समाजाच्या देशहितासाठी दिलेल्या योगदानावरही अभ्यासपूर्ण भाष्य केले.
या कार्यशाळेचा समारोप प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री गिरिश प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय जनजाती समूहामध्ये असलेल्या ज्ञानाचे सखोल संशोधन व्हावे, त्यांच्यामध्ये उपजतच असलेल्या ज्ञानाचे पुनरुजीवन मोठ्या प्रमाणात व्हावे अशी अपेक्षा पद्मश्री प्रभुणे यांनी यावेळी व्यक्त केली. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. काळकर यांनीही समारोपाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळा एकूण चार सत्रामध्ये पार पाडला .क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या जयंती समितीचे सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. धोंडीराम पवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. डॉ. अविनाश आडे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिल पारधी यांनी केले आणि प्रास्ताविक अधिसभा सदस्य राहुल पाखरे यांनी केले तर आभार अधिसभा सदस्य प्रा. डॉ. चिंतामण निगळे यांनी मानले. तिसऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुंडलिक पारधी यांनी केले व आभार अधिसभा सदस्य गणपत नागरे यांनी मानले. चौथ्या सत्राचे सूत्रसंचालन अधिसभा सदस्य राहुल पाखरे यांनी केले व प्रास्ताविक प्रा. डॉ. अविनाश आडे यांनी केले तर आभार अधिसभा सदस्य कृष्णाजी भंडलकर यांनी मानले.