दत्तात्रय वारे गुरुजी यांची पुन्हा बदली; शिक्षण मंत्री काय म्हणाले...
जालिंदर नगरच्या ग्रामस्थांनी सांगितले, की वारे गुरुजी यांची बदली झाली आहे. मात्र, एवढे मोठे काम येथे उभे राहत असल्यामुळे त्यांना आणखी एक दोन वर्ष याच ठिकाणी ठेवावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांची बदली स्थगित केली जाईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे (Dattatreya Ware) गुरूजी यांची बदली पुन्हा वाबळेवाडी (Wablewadi)येथे करावी,अशी मागणी वाबळेवाडी येथील ग्रामस्थांची आहे. तसेच जालिंदरनगर (Jalindernagar) येथून सध्या त्यांची बदली करू नये, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे सध्या तरी एक विशेष बाब म्हणून वारे गुरुजी यांची बदली स्थगित करू, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांनी सांगितले. तसेच वारे गुरुजी यांच्यासारखे महाराष्ट्रात अनेक चांगले शिक्षक आहेत. त्यांचे ज्ञान त्यांच्या शाळेपुरते मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये व महाराष्ट्रातील सर्व शाळापर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे, असेही दादा भुसे यांनी नमूद केले.
जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेची शाळा टी फोर एज्युकेशन या संस्थेच्या स्पर्धेत जगात पहिल्या क्रमांकावर आली. त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी जालिंदर नगर येथील शाळेला भेट दिली. याप्रसंगी वारे गुरुजी यांच्यासह शाळेला पुढे घेऊन जाण्यासाठी हातभार लावलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दादा भुसे बोलत होते.
दादा भुसे म्हणाले, जालिंदर नगरच्या ग्रामस्थांनी सांगितले, की वारे गुरुजी यांची बदली झाली आहे. मात्र, एवढे मोठे काम येथे उभे राहत असल्यामुळे त्यांना आणखी एक दोन वर्ष याच ठिकाणी ठेवावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांची बदली स्थगित केली जाईल. मात्र, वारे गुरुजी यांना इतर ठिकाणच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील.
पुन्हा संधी! राज्यातील शिक्षकांना २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षणासाठी मुदत
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दादा भुसे म्हणाले, दत्तात्रय वारे गुरुजी यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सर्व दानशूर आणि मदत करणाऱ्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळे जालिंदर नगरची शाळा उभी राहिली आहे. चांगले विद्यार्थी घडवण्याचे पुण्याचे काम येथे घडत आहे. वाबळेवाडी येथील शाळा सुद्धा वारे गुरुजी यांनी उभी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा उभी राहिली. सर्वांना अभिमान वाटेल, असे काम येथे होत आहे.
एका शिक्षकाने मनात विचार आणला आणि गावाने साथ दिली तर शाळा जगात एक नंबरची शाळा कशी शाळा उभी राहते, याचे जालिंदरनगर येथील शाळा हे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यामुळे दत्तात्रय वारे गुरुजी यांनी केवळ वाबळेवाडी, जालिंदरनगर शाळेकडे लक्ष न देता महाराष्ट्रातील शाळांकडे लक्ष द्यावे. गावात ज्या प्रमाणे मंदीर अत्यंत महत्वाचे आहे. त्याप्रमाणे गावातील शाळा हे सुद्धा एक मंदीराचे रूप आहे,असेच शाळेकडे पहावे. स्पर्धेच्या युगात आधुनिक शिक्षण घेतले आहे. शिक्षण भाकरीचे शिक्षण राष्ट्रीयत्वाचे हे स्लोगन आपण घेत आहोत. विद्यार्थी त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करता आले पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे,असेही दादा भुसे यांनी सांगितले.
------------------------------