शिक्षण विभागातील प्रलंबित कामे मार्गी लागणार; 'शिक्षण सेवा पंधरवडा' राबविण्याचा निर्णय

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान व पारदर्शक पद्धतीने सेवा विहित कालमर्यादेत देण्याच्या अनुषंगाने दि. ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस ‘शिक्षण सेवा पंधरवडा’ यापुढे दरवर्षी राबविण्यात येणार आहे. 

शिक्षण विभागातील प्रलंबित कामे मार्गी लागणार; 'शिक्षण सेवा पंधरवडा' राबविण्याचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


विद्यार्थी (Students), पालक (Parents), शिक्षक (Teachers), शिक्षकेत्तर कर्मचारी (Non Teaching Staff), अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या कारणासाठी त्यांना संबंधित कार्यालयात वारंवार भेटी द्याव्या लागतात. कार्यालयांमधील अनेक कामेही विविध कारणांमुळे वेळेत मार्गी लागत नाहीत. यापार्श्वभूमीवर प्रलंबित कामे व संबंधित घटकांचे प्रश्न वेळेत मागी लागण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) ‘शिक्षण सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ही संकल्पना आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान व पारदर्शक पद्धतीने सेवा विहित कालमर्यादेत देण्याच्या अनुषंगाने दि. ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस ‘शिक्षण सेवा पंधरवडा’ यापुढे दरवर्षी राबविण्यात येणार आहे. 'तातडीच्या कामांच्या निपटाऱ्या मध्ये सतत व्यग्र असल्यामुळे काही वेळा महत्त्वाची कामे मागे पडून जातात. परंतु अशा सर्व कामांचा देखील निपटारा सूत्रबद्ध पद्धतीने करण्याची सुरुवात या अभियाना च्या रूपाने होत आहे,' असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याविषयी सांगितले.

कामकाज सुधारा नाहीतर..! विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला आयुक्तांची तंबी

प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून शिक्षण सेवा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न, निवेदने व अर्ज यांचा तात्काळ नियमानुकूल निपटारा करावयाचा आहे. दर महिन्याच्या ५ तारखेला सार्वजनिक सुट्टी असेल तर त्याच्या पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. महिन्याच्या ५ तारखेला या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भुत विविध विद्यार्थी-पालकाभिमुख व प्रशासकीय घटकांशी संबंधित कामाच्या निपटायासाठी कालबद्ध मोहीम आखून प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात यावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

या कामांचा होईल वेळेत निपटारा 


प्रलंबित अर्ज, निवेदने/तकार निकाली काढणे, संबंधित कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या सुनावणी पुर्ण करणे, अभियान दिनी प्राप्त झालेले अर्ज/निवेदन/तक्रार निकाली काढणे, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा नियमित आढावा घेणे, अनुकंपा खालील प्रकरणे निकाली काढणे, प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे या बाबींवर पंधरवड्यामध्ये निर्णय घेणे अपेक्षित आहे. 

अधिकारी-कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे, बिंदुनामावली अद्ययावत करणे, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, सहा गठ्ठा पध्दतीने अभिलेख ठेवणे, जड वस्तू संग्रह नोंदवहीचे अद्ययावतीकरण करणे, नाविण्यपूर्ण योजना राबविणे अशा विविध कामे या पंधरवड्यामध्ये मार्गी लावण्याचे नियोजन आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांनी कालबध्द कार्यक्रम निश्चित करून शिक्षण संचालक तसेच इतर सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j