आवडत्या गाण्यासोबत उत्तरेही लक्षात ठेवा; काळभोर गुरुजींची शिकवण्याची अनोखी कला

शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असतात. त्यामुळे खासगी शिकवणीला जाणे परवडत नाही. पण याच कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि सहकार सारख्या अवघड विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

आवडत्या गाण्यासोबत उत्तरेही लक्षात ठेवा; काळभोर गुरुजींची शिकवण्याची अनोखी कला
Teacher Namdev Kalbhor with students

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result) गुरूवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या (Students) यशापयशाच्या बातम्या धडकू लागल्या आहेत. यंदाचा राज्याचा निकाल कमी होण्याबरोबरच गुणवत्ताही घसरल्याचे राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra HSC Board) अध्यक्षांनी सांगितले. विद्यार्थ्यांना काही विषय अवघड जात असल्याने या विषयांचेच निकाल घसरतात. पण हेच विषय गाण्यांच्या चालीवर शिकवल्यास निकाल शंभर टक्के लागतो. होय, असेच घडले आहे, वारजे माळवाडी येथील नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात.

शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असतात. त्यामुळे खासगी शिकवणीला जाणे परवडत नाही. पण याच कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि सहकार सारख्या अवघड विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचे श्रेय विद्यार्थी त्यांचे शिक्षक नामदेव काळभोर यांना देत आहेत. काळभोर हे त्यांच्या विद्यार्थ्यांना आवडत्या गाण्यांसोबत उत्तरेही लक्षात ठेवायला सांगतात. त्यामुळे ते शाळेत लोकप्रिय आहेत. 

बारा तास रुग्णालयात नोकरी अन् रात्री शाळेत; बारावीच्या परीक्षेत मुस्कान पहिली

याविषयी काळभोर यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधताना त्यांच्या या अनोख्या अध्यापनाच्या पद्धतीबद्दल सांगितले. काळभोर म्हणाले, "मुलांचा बुध्यांक किती कमी असला 'तेरी त्यांना चित्रपट, चित्रपटांची गाणी आणि त्यातील डॉयलॉग लक्षात राहतात. याच गोष्टीचा उपयोग मी करून घेतला. एखाद्या चित्रपटातील गाणं लक्षात ठेवताना त्यासोबत एखादे उत्तर सुद्धा लक्षात  ठेवायचे. शिवाय एखादी संकल्पना लक्षात ठेवताना त्या संकल्पनेतील प्रत्येक मुद्याचे पहिले अक्षर लक्षात ठेवायचे. ती सर्व अक्षरे मिळून जो शब्द तयार होतो, तो शब्द लक्षात ठेवला की ती संकल्पना आपोआप लिहिता येते. शेवटी यासाठी सुद्धा कष्ट लागतातच. ती तयारी मुलांकडून करून घ्यावी लागते."

विद्यार्थ्यांनो, पुरवणी परीक्षेच्या तयारीला लागा! सोमवारपासून अर्ज भरता येणार

"आमच्याकडे येणारे बरेच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील असतात, त्यांच्या घरी आर्थिक अडचणी व्यतिरिक्त इतरही अनेक समस्या असतात. कुणाला आई किंवा वडील यापैकी एकच पालक असतो, तर कुणाला आई वडील दोघेही नसतात. अशा परिस्थतीत या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देऊन पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. हे काम आमची संस्था करते," असे काळभोर यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo