दहावी-बारावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया दहावीच्या निकालाआधीच सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीनंतरचे पदविका व पदवी अभ्यासक्रमांची प्रक्रियाही पुढील काही दिवसांत सुरू होईल.

दहावी-बारावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार
DTE Courses Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाची (SSC Result) प्रतिक्षा विद्यार्थी व पालकांसह शैक्षणिक संस्थांनाही आहे. लाखो विद्यार्थी दहावीनंतर विविध पदविका अभ्यासक्रमांमध्ये (Diploma Courses) प्रवेश घेतात. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (Technical Education) प्रवेशासाठीची प्रक्रिया दहावीच्या निकालाआधीच सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीनंतरचे पदविका व पदवी अभ्यासक्रमांची प्रक्रियाही पुढील काही दिवसांत सुरू होईल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आतापासून जुळवाजुळव करणे आवश्यक आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट (एच.एम.सी.टी.), सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी / तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष वास्तुशास्त्र, बी. प्लॅनिंग पदवी अभ्यासक्रम (Under Graduate) या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.

पेपरफुटीमुळे पोलीस भरतीची फेरपरीक्षा घ्यावी का? समन्वय समितीने स्पष्ट केली भूमिका

त्याचप्रमाणे प्रथम वर्ष एम.ई./एम.टेक., एम. फार्म. फार्म. डी. फार्म.डी. (PostBaccalaureate). एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनिंग., एम.एचएमसीटी, एमबीए / एमएमएस, एमसीए हे पदव्युत्तर पदवी (Post Graduate) या अभ्यासक्रमांचे प्रवेशही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करतांना प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या आवश्यक त्या प्रकरणी लागू असणारी प्रमाणपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो. वेगवेगळया वर्गवारी अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक असणा-या प्रमाणपत्रांची तपशीलवार माहीती प्रवेश पुस्तिकेत दिली जाते.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे :

१) जात / जमात प्रमाणपत्र ( Caste / Tribe Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले)

२) जात/ जमात वैधता प्रमाणपत्र (Caste / Tribe Validity Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले).

अ) १० वी व १२ वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात/ जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. (मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षांतील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत जात/ जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात / जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल.)

ब) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मागासवर्गीयांसाठीच्या राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात/ जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

३) नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) (दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध) (अनूसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारासाठी) [राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास महाराष्ट्र राज्यात असला तरी महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या आरक्षणाचे धोरण त्यांना लागू नाही.]

४) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या प्रकरणी आवश्यकतेनुसार.

५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) TFWS योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले.

६) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रवर्गासाठी (EWS) महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहीत केलेल्या प्रपत्रात सक्षम प्राधिका-यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

७) अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Person with Disability) आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले.

८) सैन्य दलातील (Defence) संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

९) अल्पसंख्यांकासाठी (Minority) संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

(१०) आधार क्रमांक व संलग्नित बैंक खाते - शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo